Tarun Bharat

तीन मोठय़ा घोटाळय़ांचा होणार पर्दाफाश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : एसआयटी, खाते प्रमुखांशी आज बैठक,कोणाचीही गय न करण्याचा पुनरुच्चार

प्रतिनिधी /पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, एसआयटीकडे जी काही माहिती हाती आलेली आहे ती पाहता गोव्यात अशी आणखी तीन मोठी वेगवेगळी प्रकरणे असण्याची शक्यता आहे. या जमिनी बाहेरच्या बाहेर सरकारला विचारात आणि विश्वासात न घेताच लाटलेल्या आहेत आणि त्यातून कितीतरी कोटी रुपयांचा व्यवहार झालेला आहे. जमीन बळकावप्रकरणी सरकार कोणाचीही गय करणार नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

 ज्या कारणासाठी एसआयटीची स्थापना झाली त्या एसआयटीला आता योग्य धागा सापडत आहे. यातून कोटय़वधी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी करण्यात येईल. चौकशी होईपर्यंत सरकार मुळीच गप्प बसणार नाही. पहिलेच प्रकरण जे हाती घेण्यात आलेले आहे त्यामध्ये देखील 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा शक्य आहे. अशी अनेक प्रकरणे व त्या संदर्भातील धागेदोरे एसआयटीला मिळालेले आहेत. या अनुषंगानेच आज दि. 27 रोजी आपण एसआयटीच्या अधिकाऱयांबरोबर तसेच काही खात्यांच्या प्रमुखांबरोबर महत्त्वाची बैठक घेत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 आणखी लँडमाफियांचा होणार पर्दाफाश

 गोव्यातील या भूखंड विक्री प्रकरणात नेमके कोणकोण अडकले आहेत, त्या संदर्भातील तपशील हळूहळू उपलब्ध होत आहेत. मुळात ज्यांच्या नावावरती जमिनी आहेत त्यातील काही माणसे ही विदेशात आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत भलतीच माणसे जमिनी विकून मोकळ्य़ा झालेल्या आहेत. अशी अनेक प्रकरणे सरकारकडे आता येऊ लागली आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी आम्ही करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले.

या पथकाची स्थापना करण्यात आल्यानंतर एसआयटीने पहिला गुन्हा सीबी पीएस क्रमांक 54/22 नुसार 465, 466, 467, 468, 471, 419, 420 (भादंसं कलम 120 ब प्रमाणे) नुसार नोंदवला होता.

पहिली अटक विक्रांत शेट्टीला

तपासादरम्यान मडगाव येथील विक्रांत बाळकृष्ण शेट्टी याला 18 जून 2022 रोजी अटक करण्यात आली. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर 24 जून रोजी जामिनावर सुटका करण्यात आली व तेथून सध्या न्यायालयीन कोठडीवर कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पणजीचा मोहम्मद सुहेल गजाआड

या प्रकरणातील दुसऱया संशयितास दि. 21 जून रोजी ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद सोहेल (सांत इनेज पणजी) असे त्याचे नाव असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पुराभिलेख खात्याचे दोघेजण

सरकारी अधिकाऱयांचा हात असल्याशिवाय एवढा कोटय़वधींचा घोटाळा होऊच शकत नाही, याबद्दल एसआयटीला पूर्णखात्री होती व त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला असता एसआयटीचा अंदाज खरा ठरला.  दि. 24 जून रोजी दोन सरकारी कर्मचारी त्यांच्या तावडीत सापडले. ते दोघेही पुराभिलेख खात्याचे कर्मचारी आहेत. धिरेश नाईक-बांदोडा फोंडा, शिवानंद मडकईकर-मडकई फोंडा अशी त्यांची नावे आहेत. खात्यातील लूक रजिस्टरमधील महत्वाची कागदपत्रे चोरून प्रमुख आरोपीना देण्यात त्यांचा हात होता. त्यातील धिरेश याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

म्हापशातील तक्रारी एसआयटीकड

याच प्रकरणी यापूर्वी म्हापसा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दि. 18 जून रोजी त्याचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. म्हापसा बार्देशचे सिव्हिल कम सब रजिस्ट्रार अर्जुन शेटय़े हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तपासादरम्यान अनेक मालमत्तांचे मालक एकतर मरण पावले आहेत किंवा स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे त्यांचे कायदेशीर वारस नसल्याचे उघड झाले आहे.

आज होणार महत्वाची बैठक

एसआयटीच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी काल रविवारी घेतला. आता पुन्हा आढावा घेण्यासाठी आज दि. 27 रोजी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, मुख्य सचिव, डीजीपी, महसूल सचिव आणि प्रभारी एसआयटी यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. त्यात खास करून ज्या जमिनींचे कुणीच नोंदणीकृत मालक हयात नाहीत किंवा कायदेशीर वारसदार पुढील कोणतीही कार्यवाही न करताच स्थलांतरित झाले आहेत, अशा जमिनींच्या बाबतीत पुढील कृती ठरविण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार अशा सुमारे 70 जमिनींची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याची माहिती यापूर्वी एसआयटीने अटक केलेल्या आरोपींकडून उघड झाली होती. त्यापैकी बहुतांश मालमत्ता या वर नमूद केल्याप्रमाणे समान स्वरूपाच्या आहेत.

Related Stories

आत्मनिर्भर भारताची कोरोनाची लस घेत महामारीला हरविण्याची क्रांती घडवा

Amit Kulkarni

व्हिक्टर आल्बुकर्क यांचे निधन

Amit Kulkarni

खाण घोटाळय़ातील पीएसी अहवाल प्रसिद्ध करा

Amit Kulkarni

अर्थसंकल्पसंबंधी चर्चेवरुन गदारोळ

Patil_p

कोरोना रुग्णासोबत नातेवाईकास ठेवण्याची व्यवस्था करणार

Patil_p

केजरीवाल यांचा आजपासून गोवा दौरा

Amit Kulkarni