प्रतिनिधी /म्हापसा
कारोणा हळदोणा खुर्सावाडा येथील राजेंद्र वळवईकर यांच्या मालकीच्या घरातील गॅरेजमध्ये ठेवण्यात आलेल्या 3 दुचाकी व सायकलीला अज्ञातांनी आग लावली. ही घटना रविवारी पहाटे घडली. यात वळवईकर यांचे अंदाजे 3.50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदर घटना घड़ली तेव्हा मालक राजेंद्र वळवईकर चतुर्थीनिमित्त आपल्या मुळ गावी गेले होते. घटनेची माहिती म्हापसा अग्निशामक दलास दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पोहोचेपर्यंत तिन्ही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. ही आग नेमकी कुणी लावली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे आग वेर्ला काणका येथे लावण्यात आली होती. म्हापसा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.