वृत्तसंस्था/ रावळपिंडी
यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पाडला जात असून कदाचित या कसोटीत विक्रमी धावसंख्या नोंदविली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इंग्लंडचा पहिला डाव 101 षटकात 657 धावांवर आटोपला. इंग्लंडच्या डावामध्ये क्रॉले, डकैट, ओली पॉप आणि ब्रुक यांनी शतके झळकविली होती. त्यानंतर पाकने इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. पाकने बिनबाद 181 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि दिवसअखेर त्यांनी पहिल्या डावात 136 षटकात 7 बाद 499 धावांपर्यंत मजल मारली. पाकच्या डावामध्ये अब्दुल शफीक, इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझम यांनी दमदार शतके झळकविली.
अब्दुल शफीक आणि इमाम उल हक यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेताना सलामीच्या गडय़ासाठी 65.4 षटकात 225 धावांची द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या जॅक्सने शफीकला झेलबाद केले. त्याने 203 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांसह 114 धावा जमविल्या. शफीक बाद झाल्यानंतर इमाम उल हक फार वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. लिचने त्याला रॉबिनसनकडे झेल देण्यास भाग पाडले. इमाम उल हकने 207 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांसह 121 धावा झळकविल्या. अझहर अलीने 5 चौकारांसह 27 धावा जमविल्या. कर्णधार बाबर आझमने एका बाजूने चिवट फलंदाजी केली. बाबर आझम आणि शकील या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 123 धावांची भागीदारी केली. रॉबिनसनने शकीलला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. बाबर आझमने 168 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारांसह 136 धावांचे योगदान दिले. जॅक्सने त्याला बाद केले. मोहम्मद रिझवानने 5 चौकारांसह 29 धावा जमविल्या आणि तो अँडरसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. नसीम शहा 15 धावांवर तंबूत परतला. सलमान 10 तर झहीद मेहमूद एका धावेवर खेळत आहे. इंग्लंडतर्फे जॅक्सने 132 धावात 3, लिचने 160 धावात 2 तर अँडरसन व रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडचा संघ अद्याप 208 धावांनी आघाडीवर आहे. ही कसोटी अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 101 षटकात सर्वबाद 657, पाक प. डाव 136 षटकात 7 बाद 499 (अब्दुल्ला शफीक 114, इमाम उल हक 121, बाबर आझम 136, अझहर अली 27, शकील 37, मोहम्मद रिझवान 29, सलमान खेळत आहे 10, नसीम शहा 15, लिच 2-160, जॅक्स 3-132, अँडरसन 1-47, रॉबिन्सन 1-64).