प्रतिनिधी/ सोलापूर
तीन गुंठे जमिनीची मागणी करून पोलीस पत्नीला धमकावणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घोडा तांडा येथे घडली.
याबाबत शोभा रामू पवार (वय 45, रा. मंत्री चंडक नगर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून रामचंद्र पोमू जाधव, रवी रामचंद्र जाधव, सतीश रामचंद्र जाधव व सोनाबाई रामचंद्र जाधव (सर्व रा. घोडा तांडा) यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. फिर्यादी तसेच त्यांच्या नातेवाईकांची घोडा तांडा भागात जागा आहे. या जागेवर फिर्यादीकडून प्लॉटिंग करण्यात आलेले आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच तीन एप्रिल रोजी सकाळी संशयित आरोपी रवी याने प्लॉटिंग केलेल्या जागेत नांगर मारून नुकसान केल्याची माहिती फिर्यादीचे चुलत भाऊ एकनाथ जाधव यांनी दिली.
याबाबत फिर्यादीने घटनेच्या ठिकाणी जाऊन संशयितास जाब विचारला. त्यावेळी संशयित आरोपीने तीन गुंठे जमिनीची मागणी केली. जमीन नाही दिल्यास पोलीस खात्यात असलेल्या फिर्यादीच्या पत्नीविरोधात खोटी तक्रार देऊन नोकरी घालवितो, अशी धमकी संशयित आरोपी रवी याने दिली. याप्रकरणी दाखल गुह्याचा तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.