सुमारे 17 लाखांचे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी मध्यरात्रीनंतर बुरुड गल्ली परिसरातील तीन घरांना आग लागली. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. आगीत सुमारे 17 लाखांचे नुकसान झाले आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
विनायक मल्लेश नेसरीकर (रा. सदाशिवनगर) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. विनायक यांच्या घरात मेहबूब होसमनी हे भाडय़ाने आहेत. या घरात त्यांनी ठेवलेली फळे आगीत जळाली असून मोठे नुकसान झाले आहे. या आगीत काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.
या घराशेजारी असलेले अनिल सिद्दण्णावर व सीमा हाजगोळकर याच्या घरांनाही आगीचा फटका बसला असून तिन्ही घरांचे मिळून सुमारे 17 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास आगीची घटना उघडकीस आली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी घरांच्या भिंतीही कोसळल्या आहेत.
या घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.