Tarun Bharat

एकाच रात्रीत मोहोळ तालुक्यात एटीएम फोडीच्या तीन घटना

49 लाख 28 हजारांचा ऐवज लंपास : ओळखू येऊ नये यासाठी सीसीटीव्हीवर रासायनिक स्प्रेचा फवारा

Advertisements

प्रतिनिधी / मोहोळ

मोहोळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन एटीएम मशीनमधून तसेच कुरुल येथील एका असे एकाच रात्रीत तीन एटीएम मशीन फोडून 49 लाख 28 हजारांचा ऐवज चार अज्ञात चोरट्य़ांनी लंपास केला.
मोहोळ शहरालगत असलेल्या लोकसेवा हॉटेललगत विजापूर रोड स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोहोळच्या एटीएममध्ये अज्ञात चार चोरट्य़ांनी तोंडाला फडके बांधून आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रासायनिक हिरवा स्प्रे मारून कॅमेरा बंद केला आणि अवघ्या 15 मिनिटांत गॅस कटरच्या साह्याने मशीन तोडून त्यातील 26 लाख 28 हजार 500 रुपयांवर डल्ला मारला. हिताची पेमेंट सर्व्हिस या कंपनीचे ईश्वर म्हेत्रे यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी किरण लांडगे यांना मशीन तोडून चोरी झाल्याचे सांगितले.

चोरट्य़ांनी मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम तोडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरावर हिरव्या रंगाचा स्प्रे मारला. परंतु तेथे नागरिक येऊ लागल्याने त्यांनी प्लॅन बदलला. त्या अगोदर चोरटय़ांनी कुरुल शाखेजवळील एटीएम मशीन फोडून यातील 22 लाख 99 हजार रुपये चोरून नेल्याची फिर्याद एटीएम मशीनचे रिजनल मॅनेजर अमोल पवार यांनी कामती पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. एकूण 49 लाख 27 हजार 500 रुपयांवर तासाभरात डल्ला मारला. या चोरीचा पुढील तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुधीर खारगे हे तर कामतीचे पोलीस अधिकारी अंकुश माने तेथील चोरीचा तपास करत आहेत.

कुरुल येथील बँक ऑफ इंडियाजवळील एटीएम केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटय़ाने तोंडाला फडके बांधलेल्या अवस्थेत या मशीनमध्ये प्रवेश करून प्रथम त्याने सीसीटीव्ही कॅमेऱयावर रासायनिक हिरव्या रंगाचा स्प्रे मारून ते बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाहेर उभे असलेल्या 25 ते 30 वयाच्या तिघा साथीदारांपैकी एकाने त्यांनी बरोबर आणलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम केंद्राची मशीन तोडून यातील 22 लाख 99 हजार रुपयांची रोकड लांबवली.

इलेक्ट्रिक मॅनेजमेंट अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एटीएम देखभाल व दुरुस्ती करणारे अमोल पवार, रिजनल मॅनेजर आणि त्यांचे साथीदार रवि इंजापुरी यांना फोनवरून आयटी ऑफिसर अनिकेत पाठक यांनी सांगितले की कुरुल गावातील आपले बँक ऑफ इंडिया शाखा कुरुलचे एटीएम मशीन फोडल्याचे सांगण्यात आले. या चोरीची फिर्याद अमोल पवार यांनी कामती पोलीस ठाण्यामध्ये दिली असून त्यांनी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

चोरटय़ांचा अजब फंडा
प्रथम तोंडाला फडके बांधून चेहरा ओळखू येऊ दिला नाही. त्यानंतर मशीन कशा पद्धतीने गॅस कटरने तोडत आहेत हे व त्यांच्या हालचाली दिसू नये म्हणून कॅमेरावर रासायनिक हिरव्या रंगाचा फवारा करून कॅमेरा बंद पाडला आणि नंतर आपले कामकाज आटोपून मोठय़ा रकमेवर त्यांनी डल्ला मारला.

नागरिकांना पाहून पळ काढला
चोरटय़ांनी मोहोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेजवळील रुबल वाईन्सजवळ असलेले एटीएम केंद्र फोडले. त्यातील 26 लाख रुपये नेले. तेथे देखील अशाच प्रकारचा फंडा वापरला. त्यांनी मोहोळ-पंढरपूर रस्त्याजवळील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये देखील गॅस कटरने तोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे नागरिक जमा झालेले पाहून चोरटय़ांनी तेथून पळ काढला.

Related Stories

पत्नीवर मित्रासमवेत बलात्कार करणार्‍या नराधमांना पोलिस कोठडी

Archana Banage

सोलापूर शहरात ८८, ग्रामीणमध्ये ३३ नव्या रुग्णांची भर

Archana Banage

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पाठवा – मुख्यमंत्री

Archana Banage

नैराशेतुन रेल्वेखाली येऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar

‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणी एफआयआर दाखल

Patil_p

`एनटीपीसी’मध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा करणे शक्य

Archana Banage
error: Content is protected !!