गोंदवलेनजिक भीषण अपघातात, मृत युवक पळशीतील पाच वर्षाचा मुलगा बचावला
प्रतिनिधी/ म्हसवड
सातारा- पंढरपुर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दि. 2 रोजी दुचाकी व स्विप्ट कारच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभिररित्या जखमी झाले आहेत. या भिषण अपघातात एक चिमुरडा मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. अपघातातील तीन ही मृत युवक हे पळशी (ता. माण) येथील आहेत. त्यामुळे पळशी गावात शोककळा पसररली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दि. 2 रोजी दुपारी दिडच्या सुमारास माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात एक बुलेट व स्विप्ट क्र. एम.एच.05 व्ही. 9695 या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत बुलेटवरील तीन जण तुषार लक्ष्मण खाडे (वय 22), अजित विजयकुमार खाडे (वय 23), तर महेंद्र शंकर गौड (वय 21) यांचा जागीच मृत्यु झाला तर स्विप्ट चालक गणेश आनंदराव ढेंबरे (वय 28) व त्यांच्या बाजुला बसलेले आनंदराव ढेंबरे (वय 61) हे दोघेजण गंभिररित्या जखमी झाले आहेत. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे तर याच स्विप्टमध्ये चालक गणेश याचा पाच वर्षाचा मुलगा हा आश्चयकारकरित्या बचावला आहे. या अपघाताच्या धडकेत बुलेटवरील एकजण उडुन समोरुन येणाऱया क्रुजर गाडीच्या काचेवर जावुन पडल्याने क्रुजर क्र. एम.एच. 13 ए.सी. 1749 ची समोरील काचेचा चुराडा झाला आहे. हा अपघात इतका भिषण होता की या अपघातामध्ये जवळपास 300 फुट बुलेट ही विरुध्द दिशेला फरफटत गेली.
अपघातातील जखमी आनंदराव ढेंबरे हे ठाणे पोलीस दलातुन सेवामुक्त झाले आहेत तर त्यांचा मुलगा गणेश हा गावी दिडवाघवाडी येथे आपल्या पत्नी व मुलासह रहावयास आहे. त्यांची पत्नी ही त्यांच्या माहेरी पिंपरी चिचवडला असल्यामुळे हे दोघेजण पिता पुत्र त्यांना भेटुन गावी दिडवाघवाडीला परतत असताना त्यांच्यासोबत त्यांचा गणेशचा 5 वर्षीय मुलगा विहान हा सुध्दा त्यांच्यासोबत गावी निघाला होता. या भिषण अपघातात तो मात्र सुदैवाने आश्चर्यकारक बचावला आहे.
या अपघातानंतर म्हसवड, दहिवडी, गोंदवले येथील ऍम्बुलन्स तातडीने हजर झाल्या मात्र दहिवडी पोलीस सुमारे तासानंतर घटनास्थळी आल्याने लोक संतप्त झाले होते. त्यानंतर म्हसवड पोलीस, वडुज पोलीसही अपघातस्थळी आले होते.
उपवास सोडला अन् आभाळ कोसळलं…
नागपंचमीच्या सणानिमित्त बहिणीने भावासाठी उदंड आयुष्य लाभावे म्हणून उपवास केला होता. दुसऱया दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 12 वाजता पुरणपोळी खाऊन उपवास सोडला आणि त्यानंतर काही वेळातच भावाच्या अपघाताची माहिती समजताच बहिणीसह कुटुंबावर आभाळ कोसळलं.
जीवलग मित्रांची अकाली एक्झिट
ऐन पंचविशीतील जीवलग तिन तरुण पंचमीच्या दिवशी दहिवडीला कुत्रे आणण्यासाठी निघाले होते. अजित खाडे हा एमपीएससीचा अभ्यास करत होता तर तुषार खाडे हा काही काळ पत्रकार म्हणून काम करत होता. त्यानंतर मंडप व्यवसायानंतर आत्ता कुठे फोटोग्राफीमध्ये चांगला जम बसवला होता तर महेंद्र गौड हा घरच्या कामात मदत करत असायचा.