खूनप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक : गौंडवाडमध्ये अजूनही तणावाचे वातावरण
प्रतिनिधी /बेळगाव
गौंडवाड येथे शनिवारी रात्री सतीश राजेंद्र पाटील (वय 37, रा. गौंडवाड, ता. बेळगाव) या युवकाचा खून करण्यात आला होता. त्याच्या खुनानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. जाळपोळ, दगडफेक असे प्रकार घडले. या तरुणाच्या खूनप्रकरणी सात जणांना काकती पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी आणखी तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.
लक्ष्मी व्यंकटेश कुट्रे (वय 45), संगीता संजय कुट्रे (वय 45), शशिकला उर्फ अनिता आनंद कुट्रे (सर्व रा. भैरवनाथ गल्ली, गौंडवाड) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी सतीश पाटील याच्या खूनप्रकरणी बाळू निलजकर, लखन निलजकर, सुरेखा निलजकर, संजना निलजकर, दौलत मुतगेकर, व्यंकट कुट्रे, आनंद कुट्रे या सात जणांना अटक करण्यात आली होती.
मंदिरासमोरून वाहन हटविण्यावरून वाद झाला. त्यानंतर सतीश राजेंद्र पाटील याचा खून करण्यात आला. या घटनेनंतर गौंडवाड गावामध्ये एकच आगडोंब उसळला. यामध्ये अनेक वाहने पेटविण्यात आली. तसेच गवतगंज्याही पेटविण्यात आल्या. या घटनेनंतर परस्परांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. दंगल प्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली असून खूनप्रकरणी 10 जणांना अटक झाली आहे.
गौंडवाडमध्ये अजूनही तणावाचे वातावरण असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवस्थानची जमीन व इतर कारणासाठी गेल्या काही वर्षांपासून गौंडवाड येथे संघर्ष सुरू होता. या जमिनीवरून यापूर्वीही हाणामारी झाली आहे. त्यानंतर शनिवार दि. 18 रोजी सतीश पाटील या तरुणाचा खून झाल्यानंतर पुन्हा मोठा तणाव निर्माण झाला आहे. काकती पोलिसांनी या खून प्रकरणामध्ये सामील असलेल्या काही जणांना अटक केली आहे.