माणगावनजीक ताम्हानी घाटातील घटना ः तिघेजण बचावले
प्रतिनिधी/ खेड
रायगड जिह्यातील महाड तालुक्यातील माणगाव हद्दीतील ताम्हानी घाटातील दरीत स्विफ्ट कार कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण बचावले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रेस्क्यु टीमच्या अथक प्रयत्नाने तिघांना वाचवण्यात यश आले. घाटानजीक साचलेल्या चिखलात चालकाने अचानक ब्रेक मारल्याने कार उलटून दरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. येथे अपघात घडल्याचे रात्रीच्या सुमारास काही वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर मदतकार्य सुरू झाले.
ऋषभ किशोर चव्हाण (24), कृष्णा पंडित राठोड (27), सौरभ श्रीकांत भिंगे (25, सर्व रा. मंगळूरपीर, जि. वाशीम) अशी मृतांची नावे आहेत. कृष्ण राठोड (27), प्रवीण सरकटे (26), रोशन चव्हाण (22, सर्व रा. मंगळूरपीर, जि. वाशीम) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्वजण एम.एच. 12/ एचझेड 5535 क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून पुणे येथून देवकुंड येथे जात असताना कोंडेथर-सणसवाडी गावचे हद्दीत हा अपघात घडला.
या अपघाताची खबर मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी तसेच रेस्क्यु टीम घटनास्थळी पोहचून मदतकार्य हाती घेतले. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये माणगाव येथील साळुंखे रेस्क्यु टीम, शेलार मामा रेस्क्यू टीम पाटणूस, गरुडमाची येथील रेस्क्यू टीमच्या सदस्यांचा समावेश होता. या अपघाताची खबर अपघातातील जखमी रोशन किशोर चव्हाण याने पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार कारचालक रोहन परशुराम गाडे याच्यावर माणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करत आहेत.