Tarun Bharat

चिकोडी तालुक्यातील तिघांना दुहेरी खूनप्रकरणी फाशीची शिक्षा

अनैतिक संबंधाच्या संशयातून नऊ वर्षांपूर्वी हत्या

प्रतिनिधी /बेळगाव

अनैतिक संबंधातून झालेल्या दुहेरी खूनप्रकरणातील तिघा संशयितांना चिकोडी येथील सातवे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. खुनाच्या घटनेनंतर तब्बल नऊ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला असून बुधवारी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.

सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. चव्हाण यांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना खुनाचा गुन्हा शाबित झाल्याने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. बाबू मुत्ताप्पा आकळे, नागाप्पा मुत्ताप्पा आकळे, मुत्ताप्पा भीमाप्पा आकळे, तिघेही राहणार ममदापूर के. के., ता. चिकोडी अशी त्या आरोपींची नावे आहेत. सरकारतर्फे ऍड. वाय. जी. तुंगळ यांनी न्यायालयात बाजू मांडली.

अनैतिक संबंधांच्या संशयातून 22 ऑक्टोबर 2013 रोजी रात्री 10.30 वा. खुनाचा प्रकार घडला होता. बाभळीच्या झाडाला दोघांना बांधून कोयत्याने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शिवानंद बुर्जी याच्यावरही हल्ला करण्यात आला होता.

उपलब्ध माहितीनुसार आरोपी बाबू आकळे याची पत्नी संगीता व बसवराज प्रभाकर बुर्जी या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयाने बाबूने रात्री बसवराजच्या घरात घुसून त्याला ओढत आणले व आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या बाभळीच्या झाडाला बांधून घातले. पत्नी संगीता हिलाही फरफटत आणून तिलाही त्याच झाडाला बांधून घालण्यात आले.

संगीता व बसवराज या दोघा जणांना अर्वाच्च शिवीगाळ करीत बांधून घातलेल्या अवस्थेतच त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात भादंवि 302, 307, 506, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता. चिकोडी येथील सातवे जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. तत्कालिन पोलीस निरीक्षक शंकर रागी यांनी या प्रकरणी चौकशी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. खुनाचा गुन्हा शाबित झाल्यामुळे न्यायालयाने तिघा जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

Related Stories

शाहूनगर रस्त्यावर भलामोठा खड्डा

Amit Kulkarni

पाठय़पुस्तकांमध्ये कलेचा समावेश हवा

Amit Kulkarni

लक्स इंडस्ट्रीजची दमदार वाटचाल

Amit Kulkarni

मोहन मोरे संघ अनिल बेनके चषकाचा ‘मानकरी’

Amit Kulkarni

राज्यात बेळगाव सर्वात प्रदूषित शहर

Amit Kulkarni

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक

Rohit Salunke
error: Content is protected !!