पिस्तूल, मॅगझिन, ग्रेनेड जप्त ः सरपंचाच्या हत्येत सहभाग
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला पोलिसांनी सोमवारी तीन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, तीन मॅगझिन, 32 गोळय़ा आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात 15 तारखेला दहशतवाद्यांनी सरपंचाची गोळी झाडून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू असल्याचे बारामुल्लाचे एसएसपी रईस मोहम्मद भट यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे असल्याचे प्राथमिक तपासाअंती स्पष्ट झाले आहे.
बारामुल्ला जिल्हय़ात 15 एप्रिलला मंझूर अहमद बांगरु या सरपंचाची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयिताचा मागमूस लागल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. सहा-सात महिन्यांपूर्वीच सरपंचाच्या हत्येचा कट आखण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यानुसार सरपंचाच्या हत्येमध्ये या तिघांचाही प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. तसेच संबंधित दहशतवाद्यांचा यापूर्वीच्या अन्य कोणत्या कारवायांमध्ये सहभाग होता याचा तपासही केला जाणार आहे. नूर मोहम्मद यातू, मोहम्मद रफिक पर्रेय आणि मोहम्मद अकबर पर्रेय अशी त्यांची नावे असून ते पट्टणमधील गोशबूघ येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.