Tarun Bharat

पर्यटकांना लूटप्रकरणी तिघा महिलांना अटक

Advertisements

अटकेतील संशयितांची संख्या पोहोचली सहावर : अजूनही अनेकांना अटक होण्याची शक्यता,किनारी परिसरातील 20 टाऊड्सना अटक

प्रतिनिधी /म्हापसा

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या चंदगड (महाराष्ट्र) येथील 11 पर्यटकांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून पैसे लुटल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी ब्युटी पार्लरमधील तीन महिलांना अटक केली असून पार्लर मालकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान संशयित तिघांही महिला आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता त्या तिघांनाही 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

याप्रकरणाची गंभीर दखल घेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी दुपारी म्हापशातील पोलीस स्थानकाला भेट देऊन निरीक्षक परेश नाईक व उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

कळंगूट येथे पर्यटनासाठी आलेले चंदगडमधील युवक आपल्या परतीच्या प्रवासाला असताना म्हापशातील बोडगेश्वर मंदिराजवळ पोहोचले असता जेवणासाठी त्यांना चांगल्या रेस्टॉरंटमध्ये नेत असल्याचे सांगून नंतर एका खोलीत नेऊन त्यांना लुटण्यात आले होते. या लुटमार प्रकरणी मंगळवारी म्हापसा पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी रविवारी पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले होते, आतापर्यंत सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.

ज्या ब्युटी पार्लरमध्ये हा प्रकार घडला त्या पार्लरच्या मालकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

मसाज पार्लर बिगर गोमंतकीयांना भाडेपट्टीवर

हा मसाज पार्लर अलीकडेच मूळ गोमंतकीय मालकाने भाडेपट्टीवर बिगर गोमंतकीयाला दिला होता तेव्हापासून येथे गैरकृत्ये चालत होती, अशी माहिती हाती आली आहे. म्हापसा बोडगेश्वर मंदिराच्या समोरच असलेल्या बोशन होम मधील एका तळमजल्यावर सलून असून त्यात आतमध्ये पहिल्या मजल्यावर हा मसाज पार्लर चालत होता. मसाज पार्लरच्या नावाखाली येथे गैरकृत्ये चालत असून याच ठिकाणी चंदगड येथील 11 कॉलेज युवकांना पैसे, दागिने काढून घेऊन लुबाडण्यात आले आहे.

म्हापसा पोलिसांकडून मसाज पार्लरची तपासणी

मंगळवारी दुपारी तिघा महिलांना अटक केल्यानंतर म्हापसा पोलिसांनी त्यांना बोशन होममध्ये असलेल्या ‘एन डायर’ हेअर ब्युटी सलून ऍण्ड स्पा’ मध्ये या नेऊन चौकशी केली. ठसेतज्ञ, श्वानपथकांचा वापर करण्यात आला. घटना घडली त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. संशयित महिला आरोपीकडून सर्व माहिती मिळविली. या तिघांही महिलांनी त्या युवकांना तेल लावून मसाज केली होती त्यानंतर त्यांना मारहाण करून त्या मुलांच्या डोक्यावर तेल ओतले होते व मारहाण करून नग्न करून फोटोही घेतले होते, अशी माहिती तपासावेळी चौकशीत देण्यात आली आहे.

याप्रकरणी अन्य काही संशयित आरोपी व मसाज पार्लर मालकीण फरारी असून पोलीस त्यांच्या मार्गावर आहेत. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परेश नाईक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

नाक दाबले की तोंड उघडते…..

नाक दाबले की तोंड उघडते अशी म्हण आहे, तसे आज म्हापसा पोलीस स्थानकामध्ये झाले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गंभीर दखल घेत म्हापसा पोलीस स्थानकात भेट देऊन उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक परेश नाईक यांच्याशी चर्चा करून अशी गैरकृत्ये मसाज पार्लर, डान्सबार आणि खास करून टाऊड(दलाल) खपवून घेणार नाही, असे सुनावले. त्यानंतर म्हापसा, हणजूण व कोलवाळ परिसरात येणाऱया पोलीस अधिकाऱयांना टाऊडवर कारवाई करण्याचे आदेश देताच त्या त्या भागातील हॉकर, टाऊड व वेंडरवर कारवाई करीत एकूण 20 जणांवर गुन्हा नोंद करून त्या लोकांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तिन्ही पोलीस स्थानकात मिळून हणजूण पोलीस स्थानकात 10, कोलवाळ पोलीस स्थानकात 3 व म्हापसा पोलीस स्थानकात 7 जणांविरोधात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. नाक दाबले की तोंड उघडते असाच हा प्रकार आहे असे बोलले जात आहे. म्हापसा पोलीस स्थानकाच्या अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर हा पार्लर असून याची माहिती पोलिसांना नसावी, ही पचनी न पडणारी गोष्ट आहे. येथे एलआयबीचे कोण पोलीस येत होते येथील सीसीटीव्ही पॅमेरातून स्पष्ट होईल हे तितकेच खरे आहे.

…तर पोलिसांना जावे लागणार घरी : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा इशारा,म्हापशात पोलिसांची घेतली झाडाझडती

राज्यात येणाऱया पर्यटकांना अतिथी देवो भवः सन्मान मिळायला पाहिजे. मात्र   पर्यटकांचीच लुबाडणूक होत असल्यास ही गंभीर बाब आहे. चंदगडहून आलेल्या पर्यटकांची लुबाडणूक झाली. राज्यात टाऊड (दलाल) ची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली असून किनारी भागात बेकायदेशीर मसाज पार्लर, डान्सबार, टाऊडनी डोके वर काढलेले आहे. असे असताना पोलिसांचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.  पोलिसांची पार्लर, डान्स बारशी ‘मिली भगत’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. पर्यटनक्षेत्रातील बेकायदेशीरपणावर कारवाई न करणाऱया पोलिस अधिकाऱयांना घरी जावे लागेल, असा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे.

किनारी भागात डान्स बार, मसाज पार्लरमध्ये गैरकृत्य चालले असल्याची माहिती मिळाल्यास त्या पोलीस स्थानकातील अधिकाऱयावर निलंबनाची कारवाई होईल. आपण पर्यटनमंत्री असल्याने कधीही संशयास्पद ठिकाणी जाऊन पाहणी करणार असल्याचा इशाराही पर्यटनमंत्र्यांनी काल मंगळवारी म्हापसा येथे पोलीस स्थानकावर पत्रकारांशी बोलताना दिला. त्यांनी म्हापसा पोलीस स्थानकात जाऊन निरीक्षक परेश नाईक व उपअधीक्षक जिवबा दळवी यांची भेट घेऊन चंदगड पर्यटकांची झालेली लूट व मारहाणीची चौकशी केली. मसाज पार्लरवरील उर्वरीत संशयित आरोपींना लवकर पकडण्याचा आदेश दिला.

टाऊड (दलाल) वर कारवाई होणे गरजेचे

राज्यात जे टाऊड सर्वत्र फिरतात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हे लोक टेक्नॉलॉजी वापरून पर्यटकांना लुबाडतात. कळंगुटमधील मैफील डान्स बारचा प्रमोटर जेलमध्ये आहे, मात्र डान्स बार अद्याप सुरू आहे, हे कसे काय? असे पर्यटनमंत्र्यांनी पोलिसांना विचारले. मसाज, स्पा बीचवर बेकायदेशीरपणे चालले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. यातून गोव्याचे नाव बदनाम होते, असेही ते म्हणाले.

आपण स्वतः तपासणीसाठी घटनास्थळी जाणार

पोलीस महासंचालकांना आपण याबाबत माहिती दिलेली आहे. पोलिसांनी त्यांचे काम योग्यरित्या केले तर अशा गोष्टी बंद होऊ शकतात. चांगले पर्यटक पाहिजे असल्यास अशा गोष्टी बंद होणे काळाची गरज आहे. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी याबाबत त्वरित कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले त्याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन करतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे बोलून या गोष्टीचे मूळ पूर्णतः बंद व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. पर्यटकांना जेवण खाण मिळते म्हणून सांगणे, आतमध्ये नेणे, मारहाण करणे, लुबाडणे हे प्रकार गैर आहेत. यामागचा सूत्रधार कोण, पूर्वीचा मालक कोण, जागा भाडय़ाची की स्वतःची, टेनंट व्हेरीफिकेशन, स्पा कुणाला चालवायला दिला होता, सर्व चौकशी होणे गरजेचे आहे. मैफील डान्स बार बंद झाला नाही तर आपण त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन स्वतः पाहणी करणार आणि कारवाई करणार, असा इशाराही पर्यटनमंत्र्यांनी यावेळी दिला.

बेकायदा डान्स बार, मसाज पार्लर सापडल्यास पोलिसांवर कारवाई

किनारी भागात प्रत्येक आमदार, पंचायती पर्यटनला प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्न करतात. विरोधी पक्षनेते म्हणाले की, कळंगूट व किनारी भागात टाऊड (दलाल) स्वायपिंग मशिन घेऊनच फिरतात व पर्यटकांना लुबाडतात ते खरे आहे. त्यांनी त्यांच्या कळंगूट मतदारसंघात कारवाई करावी. किनारी भागात अशी कृत्ये खूप आहेत. ती पर्यटकांना सेवा देण्यासाठी नाही तर लुबाडण्यासाठीच कार्यरत असतात. बीच क्लिनिंग, पर्यटन, दृष्टी या सर्वांना बरोबर घेऊन एकत्रित पोलिसांची बैठक घेण्यात येईल. खास ऍपचा येत्या दोन दिवसात शुभारंभ करणार आहे. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले आहे की अशा गैरकृत्यावर त्वरित कारवाई केली जाईल. मात्र असे एका उपअधीक्षकाने सांगितले म्हणून होत नाही तर राज्यातील सर्व पोलिसांनी आता सतर्क राहायला हवे, असे मंत्री खंवटे म्हणाले.

बीट, एलआयबी पोलिसांना पार्लरबाबत माहिती नसणे आश्चर्यकारक

म्हापशात चंदगड येथील पर्यटकांना मारहाण झाल्यावर पोलिसांनी आपली कारवाई केली आहे. मात्र बीट पोलीस, एलआयबी टीम पोलिसांना या पार्लरविषयी माहिती नसणे हे गैर आहे. राज्यात कोण कोण येतात, येथे काय धंदा करतात याची माहिती पोलिसांना, गुन्हा अन्वेषण विभागाला असणे काळाची गरज आहे. पर्यटकांना राज्यात चांगली सोय मिळणे गरेजेचे आहे. गैरकृत्ये जे कुणी करतात आणि तेही बाहेरून येऊन त्यांच्यावर कारवाई होणे आणि ती तात्काळ होणे गरजेची आहे.

‘त्या’ व्हिडिओsने गोव्याच्या पर्यटनाची बदनामी

म्हापसा येथे चंदगडच्या काही युवकांना लुटण्याच्या प्रकाराने गोव्याची बदनामी होत आहे. या संदर्भात चंदगडच्या एका वकिलाने तयार केलेला व्हिडिओ जगभरात सर्वत्र व्हायरल झाल्याने त्यातून आता गोव्याच्या पर्यटनाची बदनामी होत आहे.

या संदर्भात ज्यांनी चंदगडच्या युवकांना लुटले ती माणसे देखील गोव्याबाहेरचीच आहेत. गोव्यात धंद्यासाठी आलेल्या माणसांनीच हे कृत्य केले खरे, मात्र ज्यांना लुटले त्यांनी जवळच्या म्हापसा पोलीस स्थानकावर किंवा गोव्यातील अन्य एकाही पोलीस स्थानकावर जाऊन तक्रार नोंदविली नाही. चंदगडला जाऊन तिथे ते वकिलांना भेटले आणि चंदगडला पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविली. त्यानंतर गोव्यात येऊन त्यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. आजवर कधी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गोव्याची बदनामी झाली नव्हती तेवढी व त्यापेक्षा जादा प्रमाणात गोव्याची बदनामी या प्रकाराने झाली आहे.

गोव्याबाहेरून अनेक माणसे या प्रकरणी गोव्यात घडलेली घटना खरी आहे का? असे विचारित आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.  अनेकजण तो विविध गटांमध्ये पाठवित आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या विविध प्रकारे वापर करून त्यातून सध्या गोव्याच्या पर्यटनाचीच बदनामी वाढत आहे.

गोवा सरकारने हा व्हिडिओ बंद करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. गोव्याच्या बदनामीचा हा एक प्रकारे कट बनलेला आहे. घडलेली घटना सत्य असली तरी ‘गोव्यात जाणार असाल तर विचार करा’ असाच जवळपास अनेक प्रतिक्रियांतून सूर उमटत आहे.

Related Stories

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित

Patil_p

स्वयंपूर्ण युवा मेळाव्यात एक हजार युवकांना थेट नोकरी

Amit Kulkarni

कोरोना सेवेसाठी कंत्राटीपद्धतीवर 75 कर्मचाऱयांची भरती

Omkar B

मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणाने चिखली ग्रामस्थांचा आराखडा फेटाळला

Patil_p

कोरोनामुक्त गोव्याला शेजारील राज्यांचा धोका कर्नाटक, महाराष्ट्रात वाढते रुग्ण

tarunbharat

रस्ता वाहतूक नियमभंग दंडात 1 एप्रिलपासून वाढ?

Amit Kulkarni
error: Content is protected !!