प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर, वडगाव, शहापूर शिवारामध्ये मोठय़ा प्रमाणात सुगीची धांदल सुरू आहे. महिलावर्ग सुगी करण्यासाठी शिवारात जात आहेत. मात्र अचानक मधमाशा हल्ला करताना दिसत आहेत. सोमवारी येळ्ळूर शिवारात सुगी करत असताना मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर येळ्ळूर केएलई इस्पितळामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
चांगुणा कृष्णा कुगजी (वय 70) या वृद्ध महिलेवर मधमाशांचा अधिक हल्ला झाला. त्यामुळे त्या जखमी झाल्या तर इतर दोन महिलादेखील जखमी झाल्या. मधमाशांचा हल्ला पाहून तातडीने काही जणांनी धूर केला. धुरामुळे मधमाशा इतरत्र गेल्या.
या महिलांना तातडीने येळ्ळूर केएलईमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.