मार्केट पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
बागवान गल्ली येथील एका होलसेल किराणा दुकानामध्ये चोरी केल्याच्या आरोपावरून त्या दुकानातील तीन कामगारांना राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 4 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक हुसेन केरुर, शशिकुमार कुरळे, हवालदार लक्ष्मण कडोलकर, शंकर कुगटोळ्ळी, खादरसाब खानम्मण्णावर आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. यासाठी राजस्थान पोलिसांची मदत घेण्यात आली.
13 ऑक्टोबर रोजी बागवान गल्ली येथील सदरुद्दीन चौधरी यांच्या होलसेल दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात त्यांच्याच दुकानात काम करणाऱया उत्तरप्रदेशमधील तीन कामगारांचा हात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. चोरीनंतर या कामगारांनी राजस्थान गाठले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून 4 लाख रुपये जप्त केले आहेत.