Tarun Bharat

भारताचा शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय

यजमान विंडीजविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी, शिखर धवन

पोर्ट ऑफ स्पेन / वृत्तसंस्था

सलामीवीर शिखर धवन (99 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 97) व शुभमन गिल (53 चेंडूत 64) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारताने अगदी अंतिम क्षणी विंडीजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात रोमांचक विजय प्राप्त केला. प्रारंभी, भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 50 षटकात 7 बाद 308 धावांचा डोंगर रचला. मात्र, प्रत्युत्तरात विंडीजनेही तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली होती. डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार फटकावण्याची आवश्यकता असताना सिराजच्या गोलंदाजीवर शेफर्डला एका लेगबाय धावेवर समाधान मानावे लागले आणि विंडीजची निराशा झाली.

विंडीजला या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात 15 धावांची आवश्यकता होती. मात्र, धोकादायक ठरु पाहणाऱया रोमारिओ शेफर्डला रोखण्यात सिराजला यश आले.

विजयासाठी 309 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजतर्फे काईल मेयर्स (68 चेंडूत 75) व शमरह ब्रूक्स (61 चेंडूत 46) यांनी दुसऱया गडय़ासाठी 117 धावांची भागीदारी साकारली. याशिवाय, ब्रेन्डॉन किंगने 66 चेंडूत 54 धावा जमवत उत्कंठा आणखी शिगेस नेली. त्यानंतर विंडीजचा संघ अंतिम टप्प्यात अपयशी ठरला. त्यांना निर्धारित 50 षटकात 6 बाद 305 धावांवर समाधान मानावे लागले.

त्यापूर्वी, शार्दुल ठाकुरने मेयर्स व ब्रूक्स यांना बाद करत विंडीज संघाला दुहेरी झटके दिले. मेयर्सने काही लक्षवेधी फटके साकारले. त्याने सिराजच्या गोलंदाजीवर मारलेला पूलचा फटका डोळय़ाचे पारणे फेडणारे ठरला. कर्णधार निकोलस पूरनने (26 चेंडूत 25) प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर डीप स्क्वेअर लेग व डीप मिडविकेटच्या दिशेने 2 षटकार फटकावत धावगती आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यजमान संघाला शेवटच्या 90 चेंडूत 60 धावांची आवश्यकता होती. किंग व अकिल होसेन (32 चेंडूत नाबाद 32) यांनी भारतीय संघावर सातत्याने दडपण कायम ठेवले. त्यानंतर चहलने ब्रेकथ्रू मिळवून देत ही जोडी फोडली. शेफर्ड व होसेन यांनीही जोरदार फलंदाजीवर भर दिला. मात्र, त्यांना विजय मिळवून देण्यात यश आले नाही.

संक्षिप्त धावफलक

भारत ः 50 षटकात 7 बाद 308 (शिखर धवन 99 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 97, शुभमन गिल 53 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 64, श्रेयस अय्यर 57 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 54. अवांतर 12. अल्झारी जोसेफ 2-61, मॉटी 2-54, रोमारिओ शेफर्ड, अकिल होसेन प्रत्येकी 1 बळी).

विंडीज ः 50 षटकात 6 बाद 305 (काईल मेयर्स 68 चेंडूत 10 चौकार, 1 षटकारासह 75, ब्रेन्डॉन किंग 66 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 54, शमरह ब्रूक्स 61 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 46, अकिल होसेन 32 चेंडूत नाबाद 32, रोमारिओ शेफर्ड 25 चेंडूत नाबाद 39. अवांतर 21. सिराज 10 षटकात 2-57, शार्दुल ठाकुर 8 षटकात 2-54, यजुवेंद्र चहल 10 षटकात 2-58).

कोट्स

शतक पूर्ण करता न आल्याने जरुर खंत जाणवली. मात्र, सांघिक खेळाच्या जोरावर विजय खेचून आणता आले, याचे अधिक समाधान आहे. शेवटच्या चेंडूपूर्वी झालेल्या चर्चेनुसार फाईन लेगला डीपवर नेले आणि त्याचा आम्हाला लाभ झाला.

-अर्धशतकवीर शिखर धवन

अन् शार्दुल ठाकुरचा तो चौकार निर्णायक ठरला!

भारताच्या डावातील शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरने शेफर्डला मिडविकेटच्या दिशेने चौकारासाठी पिटाळून लावले होते. त्यानंतर विंडीजला विजयाने अवघ्या 3 धावांनी हुलकावणी दिली आणि शार्दुलचा डावातील शेवटच्या चेंडूवर खेचलेला तो चौकारच निर्णायक ठरल्याचे सुस्पष्ट झाले.

उभय संघातील दुसरी वनडे आज, भारत मालिकाविजयासाठी सज्ज

पोर्ट ऑफ स्पेन

पहिल्या लढतीत निसटता विजय संपादन केल्यानंतर हंगामी कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज (रविवार दि. 24) विंडीजविरुद्ध दुसऱया वनडेत मालिकाविजय संपादन करण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरणे अपेक्षित आहे. पहिला सामना 3 धावांच्या निसटत्या फरकाने जिंकल्यानंतर आता दुसऱया वनडेत विजयी घोडदौड कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार असून त्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स वाहिनी व फॅन कोड ऍपवर केले जाईल.

सध्या फक्त वनडे क्रिकेट खेळत असलेला शिखर धवनचा क्लासिक फॉर्म आणि शुभमन गिलच्या आक्रमक सलामीमुळे भारताने विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. शिवाय, शमी-बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराजने गोलंदाजीची मुख्य धुरा उत्तमरित्या सांभाळली आहे. ऋतुराज गायकवाड व इशान किशनऐवजी पसंती मिळालेल्या शुभमन गिलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेतला आहे. क्वीन्स पार्क ओव्हलवर चेंडू सॉफ्ट झाल्यानंतर अन्य फलंदाज झगडत असताना गिलचे आक्रमण मात्र निर्णायक ठरले. आता अशा आश्वासक प्रारंभाचे मोठय़ा डावात रुपांतर करण्याची त्याच्याकडून अपेक्षा असेल.

शिखर धवनचे 18 वे वनडे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले असले तरी त्याने गोलंदाजांवर राखलेले वर्चस्व लक्षवेधी ठरले. मध्यफळीत संजू सॅमसनवर फोकस असेल, हे निश्चित आहे. सूर्यकुमार यादव, सॅमसन, दीपक हुडा व अक्षर पटेल हे आणखी एकदा विंडीज संघावर दडपण राखण्यासाठी प्रयत्नशील असतील.

सामन्याची वेळ ः सायं. 7 वा. थेट प्रक्षेपण ः डीडी स्पोर्ट्स, फॅन कोड वेबसाईट व ऍप.

Related Stories

भारत-द.आफ्रिका महिलांच्या तिरंगी मालिकेची अंतिम लढत आज

Patil_p

टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी महिला पंच पॅनेल जाहीर

Patil_p

इंग्लंडची विजयी घोडदौड कायम

Patil_p

रशियातील फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा

Patil_p

ओव्हलवर दुमदुमली विराट विजयाची ललकारी!

Patil_p

थायलंड स्पर्धेतून सात्विक- चिरागची माघार

Patil_p
error: Content is protected !!