बारामुल्लामध्ये चकमक : हल्ल्याचा कट उधळला
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवानही हुतात्मा झाला आहे. ठार झालेले तीनही दहशतवादी पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सदर दहशतवादी श्रीनगरमध्ये मोठा हल्ला करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले.
दक्षिण काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हय़ात नाजीभाट भागातील चेकनाक्यावर काही दहशतवादी येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला देण्यात आली. या माहितीनंतर पोलीस आणि लष्कराने बुधवारी पहाटेच विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान झालेल्या संघर्षात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तथापि, सुरक्षा दलातील एका जवानालाही प्राण गमवावे लागले. काश्मीर पोलीस झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटरवर या मोहिमेची माहिती दिली. ‘तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले असून चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवानही हुतात्मा झाला. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे’, असे ट्विट त्यांनी केले. चालू वर्षात आतापर्यंत 22 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहितीही आयजीपींनी दिली. पाकिस्तानी घुसखोरीविरोधात भारतीय सुरक्षा यंत्रणा जोरदार मोहीम राबवत असून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसंबंधी माहिती मिळाल्यास तातडीने सुरक्षा दलाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे