रुग्णांना थेट उत्सवमंडपात असल्याचा होतोय भास
पुणे : रुग्णालयात विविध आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना ऑगमेंटेड रिअॅलिटीद्वारे दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन देण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे ते रुग्ण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहेत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी स्टार्टअप – डिजिटल आर्ट व्हीआरई यांनी या उपक्रमाकरिता सहकार्य केले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू मधील रुग्णांना हे दर्शन घडविण्यापासून या उपक्रमाला प्रारंभ झाला. ससून रुग्णालयातील रुग्णांना बाप्पाचे यामाध्यमातून दर्शन घेताना आनंदाश्रू अनावर झाले.
अधिक वाचा : धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध; काळे झेंडे दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, मानवसेवेच्या महामंदिराकडे पुढची पायरी या उपक्रमाद्वारे चढण्याचा हा प्रयत्न आहे. पुणे शहरातील १५ रुग्णालयांमधील अंदाजे ५०० रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ट्रस्टचा मानस आहे. याबाबत संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांच्या विशेष परवानग्या घेतल्या आहेत, ज्यांनी आम्हाला उत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये हा अनुभव देण्यास अनुमती दिली आहे. यामुळे रुग्णांना वेगळी उर्जा व समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरुपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. कोविडमुळे निर्माण झालेले भय व नैराश्य दूर होऊन यामाध्यमातून रुग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.
ससून रुग्णालयात उपचार घेणारे पनवेल येथील ८७ वर्षांचे रुग्ण प्रभाकर डिंगोरकर म्हणाले, उद्याची चिंता, नकारात्मकता आमच्यासारख्या रुग्णांमध्ये नेहमी असते. मात्र, आज सकल विघ्नहर्ता गणरायाचे दर्शन झाले. जेव्हा मला भगवंताचे दर्शन झाले आणि आरती, सजावट पहायला मिळाली, त्यावेळी नकळत अशी उर्जा आली, ज्यामुळे मी लवकर बरा होईन आणि मला लवकर घरी जाता येईल.