क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर टिळकवाडी क्लस्टर व माध्यमिक विभागाच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
लेले मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंद चव्हाण, जी. एल. खांडेकर, क्रीडाशिक्षक सी. आर. पाटील, कल्लाप्पा हगीदळी, जयसिंग धनाजी, नीरज सावंत उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले.
प्रारंभी सी. आर. पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले तर प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण यांनी मेजर ध्यानचंद यांनी, भारतीय संघातून खेळताना ऑलिंपिकमध्ये दिलेल्या योगदानाची माहिती दिली. उदयोन्मुख खेळाडूंनी ध्यानचंद यांनी केलेल्या पराक्रमाची आठवण ठेवून त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, तरच आपण क्रीडा क्षेत्रात यशस्वी बनू शकतो. आपल्या शाळेचे, जिल्हय़ाचे, राज्याचे, व देशाचे प्रतिनिधित्व करीत नावलौकीक वाढवला पाहिजे, असे सांगितले.