बेळगाव : म. ए. समिती महिला आघाडी आयोजित महिला मेळावा व तिळगूळ समारंभ नुकताच मराठा बँकेच्या सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, महिला आघाडीच्या सरचिटणीस माजी महापौर सरिता पाटील, उपाध्यक्षा माजी नगरसेविका सुधा भातकांडे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
अर्चना देसाई व ग्रुपने ईशस्तवन सादर केल्यानंतर महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी महिला आघाडीच्या कार्याची माहिती दिली. वैशाली भातकांडे यांनी महिलांना मार्गदर्शन करून संक्रांतीचे महत्त्व सांगितले. यानिमित्ताने विविध खेळ घेण्यात आले. कार्यक्रमस्थळी सर्वप्रथम आलेल्या महिलेला भेटवस्तू देण्यात आली. सांघिक खेळात शिवानी रजपूत ग्रुप विजेता ठरला. तर भारती जुवेकर पैठणीच्या विजेत्या ठरल्या. सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. सरिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महिला आघाडीच्या सदस्यांनी सहकार्य केले.