मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पणजीत राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
युवकांना पुढे येण्यासाठी गोवा सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र त्या योजनांबाबत युवकांना काही माहितीच नसते. इतर राज्यांतील युवक आठवीपासूनच युपीएस परीक्षेची तयारी करायला लागतात म्हणून ते आयएएस अधिकारी होतात. गोव्यातील युवकाला पदवीधर होईपर्यंत जीपीएससी परीक्षा म्हणजे काय, तेच माहिती नसते. जीवनात जे काही करायचे आहे त्यासाठी सुरुवातीपासून तयारी करणे गरजेचे असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गोवा क्रीडा प्रधिकरण व नियोजन आणि सांख्यकी खात्यातर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, रोहीत कदम, शषांक ठाकूर व नियोजन व सांख्यकी खात्याचे संचालक सक्सेना उपस्थित होते.
अनेकांना शिष्यवृत्ती प्रदान
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिष्यवृती, अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेल्या युवकांना नोकरी पत्रे तसेच स्वातंत्रसैनिकांच्या मुलांना नोकऱया देण्यात आल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सिध्दी भट, पियुश हेमंत गावस देसाई, जॉवितो फर्नांडिस, मार्सीसा अश्वर्या कोयेल्हो, अबीगायल फर्नांडिस, अमृता नाईक, आर्या बेहेरे, गितांजली नाईक यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकरीपत्रे
ज्या स्वातंत्रसैनिकांच्या मुलांना नोकरीपत्रे देण्यात आली त्यामध्ये रुपाली गडेकर, शिवाजी नाईक, अर्चना कारबोटकर, दीपक नाईक, दृष्टी वेरेकर, राजन वेरेकर, योगेश तिळवे, हर्षदा गवस यांचा समावेश आहे.
अनुकंपा तत्वावरील नोकऱया प्रदान
अनुकंपा तत्वावर नोकऱया दिलेल्यांमध्ये साईराज नाईक, सोमा नाईक, प्रज्योत सातार्डेकर, शिआना सिमॉन्स, प्रभाजन नाईक, अनुप गावडे, साहिल कुडास्कर, वृक्षभ गावकर, रोहन पोळजी यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी युवकांशी खुली चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरेही दिली. युवकांच्या वतीने प्रमोद आचार्य मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.
गोवा युवा आयोग स्थापन करावा ः मंत्री गावडे
मंत्री गोविंद गावडे म्हणाले की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रमाणीकपणे काम करणे गरजेचे आहे. गोव्यात युवकांच्या कला क्रीडा तसेच अन्य गुणांना वाव देण्यासाठी अनेक सुविधा आहेत, मात्र आणखीनही पुढे जाऊन मी म्हणेन की गोव्यात गोवा युवक आयोग स्थापन झाल्यास आणखी चांगले होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असेही गोविंद गावडे म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.