Tarun Bharat

मराठीतून परिपत्रके देण्यासाठी ग्रा.पं.ना निवेदन देणार

तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या बैठकीत निर्णय

वार्ताहर /किणये

सीमाभागातील जनतेला जोपर्यंत मराठीतून परिपत्रके मिळत नाहीत, तोपर्यंत मोर्चा काढून तसेच विविध पद्धतीने प्रशासनाला निवेदन देऊन आमचा हक्क मिळविण्यासाठी धडपड करितच राहणार आहे. आता मराठीतून परिपत्रके द्या, अशी मागणी प्रत्येक ग्रामपंचायतीला तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत, असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांची शुक्रवारी बेळगाव कॉलेज रोड येथील कार्यालयात बैठक झाली. बैठकीत सर्वानुमते हा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक हे होते.

मध्यवर्ती म. ए. समितीच्या मार्गदर्शनाखाली दि. 27 जून रोजी मोर्चा काढून मराठीतून परिपत्रके द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. आता ही मोहीम गावोगावी राबविण्यात येणार आहे. सीमाप्रश्नाबरोबरच मराठीतून परिपत्रके मिळवून घेण्यासाठीची ही लढाई जोमाने लढू., असे बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.

गावागावांत फिरुन मराठी भाषा, संस्कृती जतन करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया गावांमधील कार्यकर्त्यांना घेवून समितीच्यामार्फत ग्रामपंचायतींना मराठीतून परिपत्रके देण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. या मोहिमेत तरुणांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा, असे मंडलिक यांनी सांगितले.

बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली येथील मंत्र्यांची भेट घेवून त्यांना बेळगाव अल्पसंख्याक कार्यालय सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन दिले होते. यावेळी संतोष मंडलिक, धनंजय पाटील, पीयुष हावळ आदी कार्यकारिणी दिल्लीत जावून आवाज उठविला होता. त्याची दखल घेत मुंबई येथे भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय होणार आहे. त्यामुळे समितीच्या या मागणीला यश आले असून याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची व उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. दत्ता उघाडे, मनोहर संताजी, सुरेश राजूकर, महेश जुवेकर, आर. एम. चौगुले, संजय पाटील, चेतन पाटील, राजू किणयेकर, विनायक पाटील, किरण मोटणकर, अंकुश पाटील आदींसह कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

Related Stories

गौरी लंकेश हत्या प्रकरणी ‘मुरली’ची बेळगावात चौकशी

Patil_p

जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाकडे पाणीपुरवठा कामगारांचे लक्ष

Amit Kulkarni

शुक्रवारी 959 रुग्ण झाले कोरोनामुक्त

Amit Kulkarni

शिरुर येथील अपघातात चार ठार

Omkar B

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंगाला शंकराची आरास

Patil_p

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे डॉ. याळगी यांचा सत्कार

Patil_p