2 वर्षाच्या कोरोना टाळेबंदीनंतर भक्तांना संधी
वार्ताहर/ गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज बुधवार 31 ऑगस्ट रोजी सर्व भक्तांना श्री गणेश चतुर्थीनिमित्त साध्या वेशात पहाटे 4.30 ते 12 या वेळेत स्पर्शदर्शन मिळणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या मंदिरात सर्व भक्तांना साध्या वेशात थेट गाभाऱयात स्पर्शदर्शन मिळते. वर्षातून हे दर्शन फक्त एकाच दिवशी मिळत असल्याने गणपतीपुळेसह परिसरातील ग्रामस्थ या स्पर्शदर्शनाचा लाभ घेतात, परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोना कालावधीत मंदिर बंद असल्यामुळे तसेच शासनाचे निर्बंध लागू राहिल्याने हे स्पर्शदर्शन ग्रामस्थांना घेता आले नाही. या वेळेस कोरोनाचे निर्बंध नसल्याने सर्व भाविकांना स्पर्शदर्शन मिळणार आहे. गणपतीपुळे येथे 31 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता स्वयंभू गणेश मंदिर उघडण्यात येऊन श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती होऊन सर्व भाविकांना स्पर्शदर्शनासाठी मंदिर 4.30 ते दुपारी 12 या वेळेत खुले करण्यात येणार असल्याची माहिती गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी दिली.
यंदाही ‘एक गाव–एक गणपती’ची प्रथा
संपूर्ण गणपतीपुळेवासीय ‘एक गाव-एक गणपती’ची प्रथा पारंपरिकरित्या यंदाही जोपासणार असून केवळ गौरीउत्सव धुमधडाक्यात घरोघरी साजरा होणार आहे. विशेष म्हणजे गणपतीपुळे मंदिरातील ’गणपती’ हाच आपला घरचा गणपती असल्याची सुमारे 500 वर्षांपूर्वींची प्रथा असल्याने गणपती मंदिरात सर्व स्थानिक ग्रामस्थ भक्तिभावाने सहभागी होतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी होणाऱया स्पर्शदर्शनासाठी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने येत असतात. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनाही ठराविक दिलेल्या वेळेत दर्शन घेण्याची सोय सुलभ होण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती प्रयत्नशील राहणार आहे.