Tarun Bharat

भारत-लंका यांच्यात आज महत्त्वाची लढत

आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा ः रोहितसेनेला कोणत्याही परिस्थितीत विजयाची आवश्यकता

दुबई / वृत्तसंस्था

भारतीय संघ आज (मंगळवार दि. 6) श्रीलंकेविरुद्ध दुसऱया सुपर-4 लढतीसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोर गोलंदाजीतील त्रुटी दुरुस्त करत असतानाच अति प्रयोग अंगलट येणार नाहीत, याचीही काटेकोर दक्षता घ्यावी लागेल. सुपर-4 फेरीत प्रत्येक संघाचे प्रत्येकी 3 सामने होणार असून गुणतालिकेत 4 पैकी पहिले 2 अव्वल संघ फायनलसाठी पात्र ठरणार आहेत. आजची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.

दुखापतग्रस्त रविंद्र जडेजा, हर्षल पटेल व जसप्रित बुमराह यांच्या गैरहजेरीचा भारताला यंदा बराच फटका बसत आला असून गोलंदाजीत फारसे पर्याय हाताशी नसल्याने त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारताने रविवारी पाकिस्तानविरुद्ध 5 गोलंदाजांना उतरवले. मात्र, भुवनेश्वर कुमार या मुख्य गोलंदाजांसह जवळपास पूर्ण लाईनअप अपयशी ठरली.

या स्पर्धेच्या सलामी लढतीत पाकिस्तानविरुद्ध मॅचविनर ठरलेल्या हार्दिक पंडय़ाची येथे सुपर-4 लढतीत मात्र बरीच धुलाई झाली. अगदी यजुवेंद्र चहल देखील यातून सुटला नाही. केवळ पाच गोलंदाज खेळवल्याने हार्दिक पंडय़ाकडून 4 षटकांचा कोटा पूर्ण करुन घेणे आवश्यक होते. त्याचाही संघाला फटका बसला. जडेजासाठी पर्यायी खेळाडू म्हणून पाहिल्या जाणाऱया अक्षर पटेलला येथे खेळवले जाऊ शकते.

पाकिस्तानविरुद्ध सुपर-4 लढतीत खेळू न शकलेल्या अवेश खानला येथे तिसरा स्पेशालिस्ट पेसर म्हणून उतरवले जाऊ शकते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारत वर्ल्डकपच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम संघच उतरवेल, असे म्हटले होते. पण, तरीही संघात प्रयोगाचे वारे सुरुच असल्याचे मागील काही लढतीतून स्पष्ट झाले आहे.

रिषभ पंतला खेळवायचे की दिनेश कार्तिकला, यावरुन बराच खल सुरु असून त्या पार्श्वभूमीवर मागील लढतीत कार्तिकऐवजी अचानक दीपक हुडाला खेळवले गेले. सध्या गोलंदाजीत फारसे पर्याय नसल्याने तेथे मर्यादा आहेत. पण, मध्यफळीबाबत संघाला तातडीने निर्णय घ्यावे लागतील, असे चित्र आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात रोहित, केएल राहुल व विराट कोहली हे टॉप थ्री स्टार आक्रमकता साकारण्यात यशस्वी ठरले, ते बलस्थान ठरले होते.

सलग दुसऱया अर्धशतकामुळे विराटवरील दडपण आता बरेच कमी झाल्यास आश्चर्याचे कारण नसेल. मात्र, येथेही लंकेविरुद्ध लढतीत आघाडीचे तिन्ही फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच तुटून पडतील, अशी अपेक्षा असणार आहे. लंकेने बांगलादेश व अफगाणविरुद्ध दणकेबाज विजय मिळवले आहेत. त्यामुळे, ते पुन्हा एकदा सर्वस्व पणाला लावून लढू शकतात. आणखी एक पराभव पत्करावा लागला तरी भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे देखील भारतासाठी ही लढत महत्त्वाची असणार आहे.

संभाव्य संघ

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, अवेश खान, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन.

श्रीलंका ः दसून शनाका (कर्णधार), दनुष्का गुणतिलका, पथूम निस्सांका, कुशल मेंडिस, चरिथ असलंका, भानुका राजपक्ष, अशेन बंडारा, धनंजया डीसिल्व्हा, वणिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, जेप्रे व्हॅन्डरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशनका, मथिशा पाथिराना, नुवानिदू फर्नांडो, दिनेश चंडिमल.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

Related Stories

दानिश फारूकचा बेंगळूर एफसीशी करार

Patil_p

दुखापतग्रस्त नेमार विश्वचषक पात्रता फेरीतून बाहेर

Patil_p

महिलांची टी-20 चॅलेंज स्पर्धा आजपासून

Patil_p

क्रोएशियाचा लेस्कोविक केरळ ब्लास्टर्सशी करारबद्ध

Amit Kulkarni

विनोद कांबळी आर्थिक अडचणीत!

Patil_p

आय लीगमधील दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p