शिखर धवनच्या नेतृत्वाखाली दुसऱया फळीतील खेळाडूंसाठी सुसंधी, 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामीसाठी भारत सज्ज, विंडीजसमोर यश खेचून आणण्याचे आव्हान
वृत्तसंस्था /पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद)
विंडीजविरुद्ध आज (शुक्रवार दि. 22) होणाऱया पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघातील दुसऱया फळीतील खेळाडू आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी सुसज्ज असतील. उभय संघातील 3 सामन्यांच्या या मालिकेत आज दोन्ही संघ विजयी सलामी देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये वनडे क्रिकेटचे सँडविच होत असून वनडेला संजीवनीची आवश्यकता सर्वश्रुत आहे. भारत-विंडीज यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका आयोजित करण्याचा हा एक भाग मानला जातो. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकप होत असताना वरिष्ठ खेळाडूंनी आता वनडे मालिकेत खेळण्याऐवजी स्वतःला अधिक ताजेतवाने राखणे क्रमप्राप्त आहे. तूर्तास, फक्त वनडे क्रिकेट खेळत असलेल्या शिखर धवनकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची सूत्रे असतील.
नियमित कर्णधार रोहित शर्मासह मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा व विराट कोहली यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. आजच्या लढतीत धवनच्या साथीला सहकारी सलामीवीर कोण असेल, याची उत्सुकता असेल. शुभमन गिलचे संघात पुनरागमन झाले आहे आणि यामुळे धवन-शुभमन असे ‘लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन’ उतरवण्याचा पर्याय हाताशी असेल. मात्र, याचवेळी इशान किशन व ऋतुराज गायकवाड हे देखील सलामीला निवडीसाठी उपलब्ध असतील.
मध्यफळीत आव्हान
भारतीय संघव्यवस्थापनासाठी मध्यफळीतील फलंदाजांची निवड, हे देखील मोठे आव्हान ठरु शकेल, असे चित्र आहे. बहरातील दीपक हुडा तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणे अपेक्षित असून सूर्यकुमार यादवचे स्थानही निश्चित असेल. मात्र, त्यानंतर श्रेयस अय्यर की संजू सॅमसन हे निश्चित करणे कस घेणारे असेल. हार्दिक पंडय़ाच्या गैरहजेरीत शार्दुल ठाकुर भारताचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू असेल. यापूर्वी अर्शदीप सिंग इंग्लंडमध्ये दुखापतीमुळे वनडे क्रिकेट मालिकेत खेळू शकला नव्हता. मात्र, गुरुवारी तो सराव सत्रात सहभागी झाला. त्यामुळे, त्याच्या पदार्पणाची शक्यता चर्चेत आहे. प्रसिद्ध कृष्णा व मोहम्मद सिराज प्रंटलाईन पेसर्स असणार आहेत.
50 षटकांचा कोटा खेळून काढण्याचे विंडीजसमोर आव्हान
विंडीजचा संघ अलीकडेच बांगलादेशविरुद्ध 0-3 फरकाने पराभूत झाला असून यावरुनच त्यांच्या फॉर्मची कल्पना यावी. आता आजपासून भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान विंडीजसमोर सर्वप्रथम 50 षटकांचा कोटा खेळून काढणे हे मुख्य आव्हान असणार आहे. 2019 वर्ल्डकपनंतर खेळलेल्या 39 डावात विंडीजला फक्त सहा वेळा 50 षटके पूर्ण खेळण्यात यश आले आहे. आजच्या लढतीत अष्टपैलू जेसॉन होल्डरचे पुनरागमन झाले असल्याने ही विंडीजची मजबुतीची बाजू ठरु शकते.
खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक?
येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक ठरु शकेल, असे संकेत असून प्रत्यक्ष लढतीच्या वेळीही असेच चित्र कायम राहिले तर यजुवेंद्र चहल, रविंद्र जडेजा भेदक मारा करु शकतील. याशिवाय अक्षर पटेलचा तिसरा फिरकी पर्याय असेल.
पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय खेळाडूंचा इनडोअर सराव
विंडीजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यापूर्वी गुरुवारी भारतीय संघ सराव करणार होता. मात्र, संततधारेमुळे खेळाडूंना इनडोअर सरावावर समाधान मानावे लागले. ‘आम्ही नुकतेच इंग्लंडमधून परतलो असल्याने येथे आऊटडोअर प्रॅक्टिस सेशन आवश्यक होते. पण, जोरदार पावसामुळे ते शक्य झाले नाही आणि आम्हाला इनडोअर सराव करावा लागला’, असे भारतीय सलामीवीर शुभमन गिल म्हणाला.
संभाव्य संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
विंडीज : निकोलस पूरन (कर्णधार), शाय होप (उपकर्णधार), शमराह ब्रूक्स, किसी कार्टी, जेसॉन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, काईल मेयर्स, गुडाकेश मोती, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, सीलेस.
सामन्याची वेळ : सायं. 7 वा.