Tarun Bharat

साथ-साथ…

देशातील विविध राज्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून एच3एन2 या इन्फ्ल्यूएंझाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच स्वाईन फ्लू आणि कोरोनानेहीही पुन्हा डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे. इन्फ्ल्यूएंझा आजाराने कर्नाटक, हरियाणा, महाराष्ट्रासारख्या राज्यातील काही नागरिकांचा बळी गेल्याने पुढच्या काही दिवसांत योग्य ती खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरते. मागची दोन ते अडीच वर्षे कोरोनाने भारतासह जगभर थैमान घातले. या आजाराशी झुंजण्यात मोठा काळ गेला. त्याची तीव्रता कमी झाली असली, तरी अद्यापही या आजाराचे समूळ उच्चाटन होऊ शकलेले नाही. केंद्रीय आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 117 दिवसांनंतर 600 हून अधिक नोंदली गेली आहे. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,197 इतकी असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात दररोज 100 पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. याशिवाय काही भागांत स्वाईन फ्लूचेही रुग्ण आढळत असून, इन्फ्ल्यूएंझासह या तिन्ही आजारांशी एकत्रितरीत्या सामना करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेने सतर्क राहायला हवे. तशी सर्दी, खोकल्याची साथ आपल्याकडे नवीन नाही. ऋतूत वा हवामानात बदल झाला, की हे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दरवर्षी दिसतात. तथापि, यंदा एप्रिल, मेच्या आधीच लक्षणीय प्रमाणात देशाच्या विविध भागांत सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून आले. 1 जानेवारीपासून साधारणपणे या आजाराचे रुग्ण देशात मोठय़ा प्रमाणात आढळत असून, हे प्रमाण फेब्रुवारीअखेरनंतर वाढत असल्याचे पहायला मिळते. कर्नाटकमध्ये 1 मार्च रोजी या आजाराने देशातील पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली. मागच्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील नगर, नागपूर व पुण्यात तीन जणांना या आजाराने प्राण गमवावे लागले आहेत. असे असले, तरी यातील बहुतांश रुग्णांना सहव्याधी होत्या, हे लक्षात घेतले पाहिजे. तरीदेखील कोणत्याही परिस्थितीत गाफील राहून चालणार नाही. मागच्या काही दिवसांत वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. तीव्र उन्हाच्या झळा, उष्म्याबरोबरच गारवा, गारपीट, पाऊस असे हवामान बदलाचे अनेक पैलू पहायला मिळताना दिसतात. त्यात इन्फ्ल्यूएंझाच्या व्हेरिएंटमध्येही बदल झाल्याचे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात येते. स्वाभाविकच रुग्णांची संख्या नियंत्रणात राहण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. कोरोना काळात नियमांचे पालन करण्यावर बहुतांश नागरिकांचा भर असे. तथापि, या नियमांच्या चौकटीत सर्वांनाच दीर्घकाळ अडकून पडावे लागले. त्यामुळे आता याबाबतीत एकूणच सैलपणा आल्याचे पहायला मिळते. असे असले, तरी सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने इन्फ्ल्यूएंझा, कोरोना वा तत्सम आजारांबाबत काळजी घेणे आवश्यक ठरते. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, इन्फ्ल्यूएंझाचा संसर्ग झाल्यास ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, घसा खवखवणे तसेच नाकातून पाणी येणे, अशी लक्षणे जाणवतात. याशिवाय धाप लागणे वा न्यूमोनियासदृश लक्षणेही रुग्णास असू शकतात. हा ताप काही दिवसात बरा होत असला, तरी खोकला दीर्घकाळ राहतो. अशा स्वरुपाची लक्षणे घरात वा मित्रमंडळीमध्ये कुणाला असतील, तर कोणताही हलगर्जीपणा न करता तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेणे आवश्यक होय. त्याबाबत कोणताही पलायनवाद वा भयग्रस्तता बाळगण्याचे काहीच कारण नाही. मुळात इन्फ्ल्यूएंझाचा हा आजार विषाणूजन्य आहे. एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीला त्याचा सहज ससंर्ग होऊ शकतो. याची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून वा शिंकण्यातून विषाणूचा प्रसार होण्याची भीती असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीने खोकताना व शिंकताना काळजी घेतली, तर बऱयाच गोष्टी सुकर होऊ शकतात. मास्क वा मुखपट्टीचा वापर करणे, हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय ठरतो. वाढते औद्योगिकरण, वाहनांचा वाढता वापर यांसारख्या कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून हवेतील प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. महानगरे व शहरांतील प्रदुषणाने तर कळस गाठला असून, हवेतील कार्बनचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते. त्यात बांधकामे व प्रकल्पांमुळे धूळ प्रदूषणातही भर पडत असून, फुफ्फुसाशी संबंधित विकारांनी लोकांचा श्वास कोंडताना दिसतो. आधीच फुफ्फुसे कमकुवत असतील, तर कोरोना इन्फ्ल्यूएंझा, स्वाईन फ्लू या श्वसनाच्या आजारांमध्ये दमछाक होणे स्वाभाविकच. म्हणूनच स्वच्छता, आहार, दक्षता ही त्रिसूत्री अंगी बाणवली पाहिजे. कोरोना काळात साबणाने हात स्वच्छ धुण्याचा नियम सर्वांनीच काटेकोरपणा पाळला. आता मुखपट्टीचा वापर व हा नियम ही एक जीवनशैलीच बनायला हवी. डोळय़ांना आणि नाकाला वारंवार स्पर्श करणे टाळायला हवे, त्याचबरोबर ताप किंवा अंगदुखी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची खबरदारी घ्यायला हवी. सात्त्विक आहार, विश्रांती, भरपूर पाणी, द्रवपदार्थांचे सेवन करणे, याकडेही कल असायला पाहिजे. इन्फ्ल्यूएंझाबाबत लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला व सहव्याधी असलेल्या व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे फ्लू प्रतिबंधक लसीकरणात अडथळे निर्माण झाले. अनेक मुलांचे लसीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे या मुलांमध्ये या विषाणूविरोधात लढण्याकरिता अपेक्षित प्रतिकारशक्ती निर्माण न झाल्याने त्यांना या आजाराची लागण होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. असे असले, तरी मुले यातून व्यवस्थित बरी होत असल्याने भीतीचे कारण नाही. तथापि, उपचारांबाबत कोणतीही दिरंगाई होता कामा नये. कोरोना महासाथीने आता विशिष्ट भौगोलिक प्रदेशात आढळणाऱया नियमित आजाराचेच स्वरुप धारण केल्याचे दिसते. त्यामुळे कोरोना, स्वाईन फ्लू, इन्फ्ल्यूएंझा यांसारख्या साथींसोबत आपल्याला यापुढे जगावे लागणार आहे. त्याकरिता प्रतिकारशक्ती वाढविण्यासह आणि सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील.

Related Stories

अर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः….सुवचने

Patil_p

वाळल्या फुलात सार्थ

Patil_p

साधुलक्षणे-ईश्वराला शरण जाणे, मननशील असणे

Patil_p

शाळा सुरू करण्यासाठी कोकण तयार

Patil_p

राजकीय कार्यक्रम बिनदिक्कत, उत्सवांना हरकत

Amit Kulkarni

अधिवेशनावर संघर्षाचे ढग

Patil_p