71 वर्षांच्या कारकिर्दीत 55 चित्रपटांचे दिग्दर्शन, 43 चित्रपटांमध्ये अभिनय
हैदराबाद / वृत्तसंस्था
टॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. निधनसमयी ते 92 वर्षांचे होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2017 मध्ये विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वोच्च पुरस्कार आहे. याशिवाय त्यांना 6 राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार, 8 राज्य नंदी पुरस्कार आणि 10 फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विश्वनाथ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी आंध्रप्रदेशातील गुंटूर जिह्यातील रेपल्ले येथे झाला. त्यांनी आपल्या 71 वर्षांच्या कारकिर्दीत 55 वैशिष्टय़पूर्ण चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून आणि 43 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. त्यांना कला तपस्वी म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी 1951 मध्ये तेलुगू चित्रपट पथ भैरवीमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी 1965 मध्ये आत्मा गोवरम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. विश्वनाथ यांनी 2010 मध्ये ‘सुभाप्रधाम’ हा शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.