Tarun Bharat

जुने गोवे, आग्वाद येथे उद्या योग प्रात्यक्षिके

एक हजार जणांचा असेल सहभाग : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

यंदाचा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस ’मानवतेसाठी योग’ या संकल्पनेवर साजरा करण्यात येणार असून त्यासाठी गोव्यात दोन ऐतिहासिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर चर्च परिसर आणि आग्वाद किल्ला येथे योग प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी ही ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यापैकी जुने गोवे येथील कार्यक्रमात स्वतः श्री. नाईक सहभागी होतील. तर आग्वाद येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांची उपस्थिती असेल. सकाळी साडेपाच वाजल्यापासून कार्यक्रम प्रारंभ होईल, असे श्री. नाईक यांनी सांगितले.

यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने गोव्यासह देशातील 75 प्रतिष्ठित पर्यटन स्थळे निश्चित केली आहेत. भारताचे समृद्ध सौंदर्य, स्थलाकृती, भौगोलिक महत्त्व आणि वास्तुकला प्रदर्शित करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर अतुल्य भारत ब्रँडचा प्रसार करण्यासाठी यंदा ’मानवतेसाठी योग’ ही संकल्पना निश्चित केली आहे.

कार्यक्रमात अंदाजे 800 ते 1000 स्पर्धकांचा सहभाग घेणार असून त्यात प्रामुख्याने गोवा योग अकादमी, जुने गोवे जिल्हा पंचायत, ग्रामपंचायती, श्री क्षेत्र तपोभूमी येथील श्रीदत्त पद्मनाभ पीठ, नेहरू युवा केंद्र, विद्या प्रबोधिनी महाविद्यालय, लायन्स क्लब, रोटरी क्लब, सम्राट क्लब, एमपीटीचे अधिकारी, यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.

दरम्यान, यंदाच्या योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकातील म्हैसूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. जगभरात 100 शहरे आणि 100 संस्था या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

पत्रकार परिषदेला गोवा योग अकादमीचे मिलिंद महाले, इंडिया टुरिझमचे डी. व्यंकटेशन, सूरज नाईक, पसूकाचे सहसंचालक विनोद कुमार यांची उपस्थिती होती.

Related Stories

मुख्यमंत्र्यांहस्ते अद्ययावत जेटी टर्मिनल इमारत, पर्यटक सुविधांची पायाभरणी

Amit Kulkarni

नुवेतून राजू काब्राल निवडणूक लढविणार

Amit Kulkarni

बेपत्ता सिद्धी नाईकचा बागा येथे बुडून मृत्यू

Omkar B

आकें – मडगाव येथील बालोद्यानाची दुरवस्था

Amit Kulkarni

डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड होताच सांखळीत जल्लोष

Amit Kulkarni

आमदार लोबो दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंद

Amit Kulkarni