उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्हय़ातील काजल श्रीवास्तव नामक युवतीने एक उपकरण निर्माण केले असून ते आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी अतिशय साहाय्यभूत ठरत आहे, असा दावा केला जात आहे. हे उपकरण म्हणजे एक ‘जैव बँड’ असून तो मनगटाभोवती बांधल्यास हृदयाचे स्पंदन तसेच नाडीचे ठोके यांचे अचूक आकलन करता येते. तसेच हृदयाच्या आणि नाडीच्या ठोक्मयांमध्ये होणारे बदलही त्वरित मापता येतात. आयुर्वेदामध्ये सर्वसाधारणतः यंत्रांच्या साहाय्याने रोगनिदान केले जात नाही. त्यासाठी वैद्याचे कौशल्य किंवा वैद्य रुग्णाला हात लावून करत असलेली परीक्षा हाच उपाय असतो. तथापि, हे उपकरण ऍलोपॅथितील स्टेथोस्कोपसारखे काम करते. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार घेणाऱयांसाठी आयुर्वेदाच्या नियमांचा भंग न करता नाडी परीक्षा करण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला आहे, असा अनुभव असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येते.
काजल श्रीवास्तव या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनियर आहेत. त्यांनी चार वर्षे प्रयत्न करून हा ‘जैव बँड’ तयार केला आहे. आयुष विभागानेही त्याला मान्यता दिली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यावर अद्यापही प्रयोग केले जात असून त्याचा नेमका उपयोग आणि परिणाम यावर परीक्षणे केली जात आहेत. 2019 मध्ये एक स्टार्टअप कंपनी स्थापन करून श्रीवास्तव यांनी या उपकरणाचा प्रोटोटाईप तयार केला होता. तो यशस्वी ठरल्याने भारत सरकारच्या जैव उद्योग मंत्रालयाने श्रीवास्तव यांना 45 लाख रुपयांचे अनुदान घोषित केले आहे. श्रीवास्तव यांनी पेटंटसाठीही 2020 मध्ये अर्ज केला आहे. त्यांना पेटंट अर्जाची पावती मिळाल्याने त्या आपले उपकरण विकण्याच्या स्थितीत आहेत. या उपकरणाचे ऑनलाईन प्रि-बुकिंग सुरू असल्याचे सांगण्यात येते. या उपकरणासंबंधी अद्याप अधिकृतरीत्या मान्यता किंवा अप्रुव्हल मिळालेले नसल्याचेही सांगण्यात येते. तरीही त्याची परीक्षणे यशस्वी ठरली असून लवकरच आयुर्वेदामध्येही अशातऱहेची जैव उपकरणे उपयोगात आणली जाऊ शकतील, असे अनेकांचे मत आहे.