प्रवाशाकडून 2 लाख 57 हजारासह 289 ग्रॅम सोने ताब्यात
वार्ताहर /काकती
हिंडाल्को येथील चेकपोस्टवर कार्यरत विशेष पथकाने बसमधील एका प्रवाशाकडून 2 लाख 57 हजार 500 रुपये रोख व 289 ग्रॅम सोने जप्त केले आहे. मंगळवार दि. 18 रोजी दुपारी 1.20 वाजण्याच्या सुमारास चेकपोस्टवर परिवहन मंडळाची बस थांबवून झडती घेतली. त्यावेळी संकेश्वरमधून निघालेल्या या बसमधील शब्बीर नावाच्या प्रवाशाची चौकशी केली असता त्याच्याकडून रोख 2 लाख 57 हजार रुपयासह 289 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. पथकाचे कार्यकारी दंडाधिकारी अरुण नाईक व पोलिसांनी रोख रक्कम व सोन्यासंबंधी कागदपत्रे सादर करण्यास सांगितल्यावर प्रवाशाने कागदपत्रे दाखविली नाहीत. त्यामुळे ही रक्कम ट्रेझरीत पाठवून प्राप्तिकर विभागाला याची माहिती देण्यात आली. हिंडाल्को येथील तपास पथकाचे कार्यकारी दंडाधिकारी अरुण नाईक, एपीएमसी पोलीस इन्स्पेक्टर रमेश आवजी, पीएसआय त्रिवेणी नाटीकर, हेडइन्स्पेक्टर सुवर्णा पवार, बसवराज, हवालदार हुलकवी आदींनी परिवहन मंडळाच्या बसची कसून तपासणी केली.