पॅलेस्टाईनचे अध्यक्ष अब्बास यांच्याशी चर्चा, सुनाक यांचा इस्रायलला पाठिंबा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला आहे. गाझा पट्टीत रुग्णालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि सांत्वना दिली. गाझा पट्टीत कार्यरत असणाऱ्या इस्लामी जेहाद या दहशतवादी संघटनेमुळे रुग्णालयात स्फोट झाल्याचे आता उघड होत आहे. इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर त्या देशाने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत 3 हजार 785 पॅलेस्टाईनी नागरीकांचा मृत्यू झाल्याचा दावा पॅलेस्टाईनच्या प्रवक्त्याने केला आहे. गाझा पट्टीत मानवी संकट निर्माण झाले असून पॅलेस्टाईनला तातडीच्या साहाय्याची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी केले. हमासचा संपूर्ण नायनाट केल्याखेरीज कारवाई थांबविणार नाही, असे इस्रायलने गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
इस्रायलचे हल्ले सुरुच
इस्रायलच्या उत्तर भागात युद्धाची आणखी एक आघाडी उघडली गेली आहे. या आघाडीवरही इस्रायलने शत्रूचा समाचार घेण्यास प्रारंभ केला असून लेबेनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे दोन म्होरके यमसदनी धाडले आहेत. आतापर्यंत हिजबुल्लाचे सात कमांडर्स मारले गेले आहेत. लेबेनॉनच्या अनेक लष्करी ठाण्यांवरही इस्रायलने वायू हल्ले चढविले असून ही ठाणी नष्ट केली.
खान युनूस हल्ल्यात चार ठार
गाझा पट्टीत इस्रायलने खान युनुस या भागात चढविलेल्या वायू हल्ल्यात चार पेलेस्टाईनींचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय हमासचे काही शस्त्रसाठे भस्मसात करण्यात आले आहेत. हमासजवळचा अग्निबाणांचा साठा आता संपत आला आहे, असेही वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे.
भूमीवरील कार्यवाही होणारच
इस्रायलने गाझा पट्टीच्या उत्तर भागात प्रवेश करण्याची सज्जता ठेवली आहे. शेकडो रणगाडे प्रवेश करण्याच्या स्थानी पाठविण्यात आले असून 1 लाख सैनिक हमासवरील भूमी अभियानासाठी सज्ज आहेत. आपल्या आरक्षित सैनिकांनाही इस्रायलने बोलाविले असून या आवाहनाला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक देशांमधील ज्यू नागरीक मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या नोकऱ्या सोडून इस्रायलच्या सैन्यात येत आहेत. असे चार लाख सैनिक आता जमले आहेत.
सुनाक यांचा इस्रायलला पाठिंबा
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी इस्रायलला या आणिबाणीच्या स्थितीत पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यांनी बुधवारी इस्रायलचा दौरा केला. त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. गाझा पट्टीत रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात इस्रायलचा कोणताही सहभाग नाही, याची शाश्वती ब्रिटनला उपलब्ध पुराव्यांवरुन मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉनही इस्रायलचा दौरा करण्याची शक्यता आहे.
दहशतवादाविरोधात भारत ठाम
कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचा नायनाट केल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही. कोणीही कोणत्याही कारणास्तव दहशतवादाचे समर्थन करु नये, अशी भारताची ठाम भूमिका असून भारत तिचा पाठपुरावा करीत आहे. इस्रायलवरील भीषण हल्ल्याची भारताने अत्यंत कठोर शब्दांमध्ये निर्भर्त्सना केली असून दहशतवादी संघटनांना संपविण्यासाठी साऱ्या जगाने एक झाले पाहिजे, हे भारताचे म्हणणे विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले. पॅलेस्टाईनच्या अधिकारांचेही भारत समर्थन करतो. त्यासंबंधातील भूमिका आम्ही अनेकवेळा स्पष्ट केली आहे, असेही बागची यांनी प्रतिपादन केले.
रशियाकडून साहाय्य
रशियाने पेलेस्टाईनला 27 टन साहाय्यता सामग्री पाठविण्याची घोषणा केली आहे. हे साहाय्य अन्नधान्ये, औषधे इत्यादी प्रकारांचे असेल. गाझा पट्टीत साहाय्यता सामग्री मर्यादित स्वरुपात पाठविण्यास ईजिप्तने मान्यता दिली असून राफा येथील प्रवेशद्वार त्यासाठी काहीकाळ उघडले जाणार आहे. पेलेस्टाईनी शरणार्थींना मात्र, ते मुस्लीम असूनही ईजिप्तने आपल्या भूमीत प्रवेश देण्यास नकार दिला आहे. कोणत्याही मुस्लीम देशाने या शरणार्थींना आश्रय देण्यास नकार दिला असून केवळ त्यांना शाब्दीक समर्थन दिल्याचे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक आंतरराष्ट्रीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे इस्रायलला दोष देण्याचा नैतिक अधिकारही त्यांनी गमावल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
युद्ध आघाडीवर दिवसभरात…
- ब्रिटनचे पंतप्रधान सुनाक यांचे इस्रायल आणि नेतान्याहू यांना समर्थन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पेलेस्टाईनचे मोहम्मद अब्बास यांच्याशी चर्चा
- अमेरिकेच्या अनेक लोकप्रतिनिधींचे इस्रायलला समर्थन, साहाय्यता देणार