पुणे / वार्ताहर :
पुणे कस्टम विभागाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मागील एक वर्षभरात जप्त केलेले सुमारे पाच कोटी रुपयांचे 1033 किलो अमली पदार्थ महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी, रांजणगाव, पुणे याठिकाणी नष्ट केल्याची माहिती सीमाशुल्क आयुक्त यशोधन वानगे यांनी दिली.
वानगे म्हणाले, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रोन, एमडी आदींचा समावेश आहे. विविध अमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली औषधे विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर ड्रग लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजद्वारे नियमितपणे नष्ट केली जातात. नऊ वेगवेगळय़ा प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईत एकूण 19 तस्करांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. समाजात अमली पदार्थांच्या गैरवापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 12 ते 26 जून दरम्यान अमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. पुणे कस्टम्स विभागाने जनतेला बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीची माहिती देण्यासाठी फोन क्रमांक 020-26119441 आणि ईमेल आयडी narcotics-cuspune@gov.in कार्यरत केला आहे.