हजारोंच्या उपस्थितीत गणरायाला भावपूर्ण निरोप : मुसळधार पावसातही तरुणाई बेभान : सर्वच मंडळांकडून पारंपरिक वाद्यांचा वापर
प्रतिनिधी/ सोलापूर
पारंपरिक वाद्यांचा जयघोष, ढोल ताशांचा कडकडाट, मुसळधार कोसळणारा पाऊस त्यातही बेभान होऊन नाचणारी तरुणाई, भव्य दिव्य देखावे अशा भक्तिमय वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत सोलापुरात पुढील वषी लवकर येण्याची विनंती करीत श्रीगणरायाला निरोप देण्यात आला.
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव झाले नव्हते. यंदा सर्वच मंडळांनी मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा सोलापुरात मोठय़ा उत्साहात श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. सकाळी अकराच्या सुमारास मानाच्या देशमुख गणपतीची पूजा दत्त चौक येथे मान्यवरांच्या हस्ते झाली. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला सुरवात झाली. शहरातील सर्व आठही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या.
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मध्यवर्तीमध्ये थोरला मंगळवेढा तालीम, पाणीवेस तालीम, समर्थ तरुण मंडळ, सरदार वल्लभभाई तरुण मंडळाच्या मिरवणुकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीत चौत्रा पूना नाका, क्रांती तालीम तरुण मंडळ, 105 उमानगरी गणेशोत्सव मंडळ, लोभा मास्तर चाळ येथील मंडळ आदी मंडळांचा सहभाग होता. सर्वच मंडळांनी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरला होता.
सायंकाळच्या सुमारास पाऊस आल्यानंतर मिरवणुकांमध्ये थोडा विस्कळितपणा आला होता. त्यातच सायंकाळी सहाच्या सुमारास अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही अचानक खंडित झाला. वाहनांवरील जनरेटरही पावसामुळे सुरू करणे कठीण झाले होते. सातनंतर पाऊस थांबल्यानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साहाला उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. मध्यरात्री 12.05 वाजता (00.05) सर्व बाजूंनी पोलिसांनी एकत्र येऊन सर्व ठिकाणचे डीजे बंद केले. त्यानंतर वाद्य बंद करून श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुका पुढे मार्गस्थ झाल्या. अग्निशमनची एक गाडी तैनात करून कर्मचाऱयांना अलर्ट केले होते. मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस व पोलीस अधिकारी मिरवणूक मार्गावर तैनात होते. याशिवाय मंडळातील स्वयंसेवकही कार्यकर्त्यांना शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना देत होते. महानगरपालिकेने मोठे गणपती मूर्ती कृत्रिम हौदामध्ये विसर्जित करून मूर्ती पालिकेकडे सपूर्द कराव्यात या योजनेलाही अनेकांनी प्रतिसाद दिला.
आजोबा गणपतीचे झाले शनिवारी सकाळी विसर्जन
शहरातील सर्वच मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता लेझीम, ढोल, टिपरी, झांज पथक आदी पारंपरिक वाद्यांच्या निनादात सुरू झाल्या. सर्वच मिरवणुकांची वाद्ये रात्री बारा वाजता बंद करण्यात आली. त्यानंतर हळूहळू सर्वच मंडळे विसर्जनाकडे मार्गस्थ झाले. मात्र, शहरातील आजोबा गणपतीचे रात्रभर मिरवणुकीनंतर तब्बल वीस तासानंतर म्हणजेच शनिवारी सकाळी सात वाजता विष्णू घाट येथे विसर्जन झाले.
लाल आखाडा गणपतीचे क्रेनच्या साह्याने विसर्जन
सोलापूर शहराच्या जोशी गल्लीतील लाल आखाडा मंडळाच्या 16 फूट उंच वस्ताद गणपतीचे विसर्जन क्रेनच्या साह्याने करण्यात आले. या मंडळाच्या वतीने सुमारे 16 फूट उंच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मूर्ती उंच व मोठी असल्याने विसर्जनासाठी अगोदरच क्रेनची सोय करण्यात आली होती. गणपती घाट येथे या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.