प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा कंझ्युमर (म्हापसा बझार) सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हापसा येथील इंद्रधनुष्यच्या सभागृहात भागधारकांच्या उपस्थित पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवानंद (बाप्पा) धावजेकर, व्हाईसचेअरमन भिकू आजगावकर, संचालिका रेणुका (रुपा) भक्ता, संचालक परेश सिरसाट, प्रकाश धुमाळ, एकनाथ म्हापसेकर, विनायक दिवकर, शामसुंदर कवठणकर, सचिव युवराज पेटकर उपस्थित होते.
प्रारंभी, संस्थेचे दिवंगत भागधारक व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चेअरमन शिवानंद धावजेकर यांनी स्वागत करून मागील आढावा घेतला. यावेळी भागधारक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कोविडच्या दोन वर्षांच्या कालावधीतही म्हापसा कंझ्युमर सोसायटी नफ्यात आणण्याचा संचालक मंडळाने प्रयत्न केल्याबद्दल भागधारकांनी अभिनंदन केले. संचालक मंडळाने एकसंघ राहून कर्मचाऱयांसोबत पेमाने काम करण्याची गरज आहे व कर्मचाऱयांनी ग्राहकांना चांगली सेवा देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आज दुकाने व मिनी मार्केटची उभारणी मोठय़ा प्रमाणात होऊ लागली. त्याची जाणीव संस्थेने ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छ माल ठेवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखण्याची सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे गोविंद शिरोडकर यांनी, सोसायटीसाठी केलेल्या नवीन कायद्यांचे पालन करण्याची सूचना केली.
सभेत प्रा. रवींद्र फोगेरी, जयवंत नाईक, महेश फळारी, श्रीपाद येंडे, शामसुंदर पेडणेकर, दीपक म्हाडेश्री, सगुण कवठणकर, देवेंद्र राठवड, गोविंद शिरोडकर, निशिकांत साळगावकर, चित्रा मणेरकर, रमाकांत चातिम, पांडुरंग वालावलकर, मंगलदास तेंडुलकर व इतरांनी चर्चेत भाग घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.
प्रारंभी, चेअरमन शिवानंद धावजेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून भागधारकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव युवराज पेटकर यांनी केले. अहवालाचे वाचन संचालक शामसुंदर कवठणकर यांनी केले तर संचालक परेश सिरसाट यांनी जमाखर्च सादर केला. सूत्रसंचालन संचालक प्रकाश धुमाळ यांनी केले तर संचालिका रेणुका (रुपा) भक्ता यांनी आभार मानले.