इस्लामिक संघटनेकडून धमकीचे पक्ष : सुरक्षेत करण्यात आली वाढ
वृत्तसंस्था / वाराणसी
वाराणसीमध्ये ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाच आदेश देणाऱया न्यायाधीशाला धमकी मिळाली आहे. इस्लामिक आगाज मूव्हमेंट या नावाने न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना रजिस्टर्ड पोस्टद्वारे धमकीचे हे पत्र पाठविण्यात आले आहे. हा प्रकार समोर येताच न्यायाधीशाच्या लखनौ तसेच वाराणसीतील निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी 9 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर वाराणसीच्या आयुक्तांनी याप्रकरणी तपास करण्याची सूचना पोलिसांना केली आहे.
रजिस्टर्ड पत्र इस्लामिक आगाज मूव्हमेंट या नावाने आले आहे. पत्रात आता न्यायाधीश देखील भगव्या रंगाचे पाईक ठरल्याचे नमूद आहे. न्यायाधीश निर्णय उग्रवादी हिंदू आणि त्यांच्या संघटनांना खूश करण्यासाठी देतात, मग त्याचे खापर विभाजित भारतातील मुस्लिमांवर फोडत असल्याचे पत्रात लिहिले गेले असल्याची माहिती न्यायाधीश दिवाकर यांनी दिली ओ.
न्यायाधीश देखील आता परिस्थिती पाहून निर्णय घेत आहेत, तुम्ही स्वतः मूर्तिपूजक आहात, मशिदीला मंदिर घोषित कराल. कुठल्याही मूर्तिपूजक हिंदू न्यायाधीशाकडून मुस्लीम योग्य निर्णयाची अपेक्षा करू शकत नसल्याचे पत्रात न्यायाधीशांना उद्देशून लिहिले गेले आहे.
न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाशी निगडित निर्णयादरम्यान स्वतःच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली होती. या निर्णयात त्यांनी ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. टाळे उघडून किंवा तोडून सर्वेक्षण व्हावे, ते थांबविले जाऊ नये असे त्यांनी आदेशात नमूद केले होते.
साधारण विषयाला असाधारण ठरवून भीतीचे वातावरण तयार करण्यात आले आहे. माझ्या कुटुंबाला माझी आणि मला कुटुंबाची सदैव चिंता वाटत आहे. घराबाहेर असल्यास पत्नी वारंवार माझ्या सुरक्षेसाठी चिंता करत राहत असल्याचे न्यायाधीशांनी स्वतःच्या निर्णयावेळी म्हटले होते.
न्यायाधीशांनी धमकीच्या पत्राप्रकरणी पोलीस महासंचालक, अप्पर मुख्य सचिव (गृह) आणि वाराणसीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी मिळालेल्या धमकी पत्राची चौकशी पोलीस उपायुक्तांना सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी दिली आहे.