प्रतिनिधी /बेळगाव
हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून दहावे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन 12 ते 18 जूनदरम्यान गोवा येथे होणार आहे. रामनाथ देवस्थान फोंडा येथे होणाऱया या अधिवेशनात हिंदू राष्ट्र संसद भरविली जाणार आहे.
या अधिवेशनामध्ये हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग, मंदिरांचे सुव्यवस्थापन, हिंदू शैक्षणिक धोरणांचा अवलंब या विषयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे गोवा, पश्चिम महाराष्ट्र व गुजरातचे समन्वयक मनोज खाडे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनामध्ये नेपाळ, श्रीलंका, अमेरिका, इंग्लंड यासह भारतातील 26 राज्यांमधील 350 हून अधिक हिंदू संघटनांचे 1 हजारपेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अधिवेशनामध्ये ऑनलाईन सहभागही घेता येणार आहे. काश्मीरमध्ये हिंदूंवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब असून या विषयीही चर्चा केली जाणार
आहे.
बेळगाव समन्वयक बापू सावंत म्हणाले, काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे बाकी आहे. देशभर हिंदूंच्या मिरवणुका तसेच धार्मिक उत्सवांवर भीषण हल्ले होत आहेत. याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.
हमारा देश संघटनेचे वेंकटेश शिंदे यांनी, प्रत्येक हिंदूने या अधिवेशनात सहभाग घेण्याचे आवाहन केले.