बसुर्ते येथील घटना, काकती पोलिसांकडून तपासकार्य सुरू, ग्रामस्थांत खळबळ
वार्ताहर /उचगाव
बसुर्ते येथील ब्रह्मलिंग मंदिरामध्ये रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या समोरील मुख्य प्रवेशद्वारातील व गाभाऱ्याचे कुलूप तोडून जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे दागिने व दानपेटीतील रक्कम लांबविल्याची घटना घडली. सदर चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या चोरी प्रकरणामुळे भाविक भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, बसुर्ते गावाच्या उत्तर दिशेला ब्रह्मलिंग देवाचे मोठे मंदिर असून या मंदिरामध्ये रोज सकाळी, संध्याकाळ पूजाअर्चा सुरू असते. गावापासून काही अंतरावर मंदिर असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी भाविक-भक्तांची ये-जा असते. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या मंदिराच्या समोरील प्रवेशद्वाराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला व गाभाऱ्यातील दरवाजाचेही कुलूप तोडून मूर्तीवरील चांदीचा मुकुट व इतर दागिने, गणपतीची मूर्ती, तांब्या असे चांदीचे जवळपास सव्वा किलो किमतीचे दागिने चोरल्याचे उघडकीस आले आहे. एक वर्षापासून जमलेली रक्कम अंदाजे 50 हजार रुपये व दानपेटी फोडून रक्कम चोरली आहे. जवळपास दीड लाखासह रोकड चोरी केल्याचे दिसून आले आहे.
सोमवारी पहाटे पुजारी मंदिरात पूजेसाठी गेला असता समोरील दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने गावातील पंचमंडळींना खबर दिली. पंचमंडळींनी तातडीने मंदिराकडे येऊन पाहताच गाभाऱ्यातील कुलूप तोडल्याचे आणि चोरी झाल्याचे उघड झाले. सदर पंचकमिटीने तातडीने काकती पोलीस स्टेशनला कळवून मंदिरात चोरी झाल्याचा वृत्तांत सांगितला. काकती स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदिरातील चोरीची पाहणी केली. श्वानपथक गाभाऱ्यात जाऊन परत मंदिरातून बाहेर येऊन जवळपास असलेल्या ओढ्यापर्यंत जाऊन थांबले. या घटनेचा पंचनामा काकती पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून पुढील तपास चालविला आहे.