वार्ताहर /सांबरा
शिक्षण खात्यामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या प्राथमिक शाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत कणबर्गी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत मुलींच्या थ्रोबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. 600 मीटर धावणे स्पर्धेत साई घसारी याने प्रथम व उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. 200 मीटर धावणे स्पर्धेत रेणुका दसका हिने द्वितीय, उंच उडीमध्ये प्रथम व लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. डिस्क थ्रो स्पर्धेमध्ये वैष्णवी मुतगेकर हिने प्रथम तर गोळाफेक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. प्रगती मुचंडीकर हिने गोळाफेक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अशोक बसरीकट्टी, मुख्याध्यापक सुरेश अष्टगी व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.