वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटात वीर योध्याची नावे बदलल्याने संताप; दोन तास व्यवहार बंद करत व्यक्त केला निषेध
विनायक पाटील / नेसरी
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नेसरी खिंडीतील सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या जीवन चरित्रावर काढलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडल्याने विरोध होत आहे. या सात वीर योध्यांपैकी सहा वीर योध्याची नावे चित्रपटांत काल्पनिक व चुकीची दाखविल्यामुळे शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करत नेसरी खिंडीतील पंचक्रोशीतून मंगळवारी मोर्चा काढून याचा निषेध व्यक्त केला. यावेळी नेसरी विभागातील गावांतून मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. तर यावेळी दोन तास गावातील व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यासाठी व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी सहभागी झाले होते.
नेसरीच्या खिंडीत सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा मावळ्यांनी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. या विषयावर महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकत्याच या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी सहा सरदारांच्या मूळ नावाऐवजी चित्रपटांत काल्पनिक नावे दाखविण्यात आली आहेत. इतिहासाची मोडतोड केल्याचा हा प्रकार आहे. याबाबत शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर नेसरीकर ग्रामस्थांतून संताप व्यक्त करत मंगळवारी सकाळी नऊ वाजता प्रतापराव गुर्जर चौकातून गावातील मुख्य मार्गावरून निषेध मोर्चा निघला. तर तातडीने हा चित्रपट मागे घ्यावा, अशी मागणी होवून हातात निषेधाचे फलक घेवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निषेध फेरी नेसरी बसस्थानकावर येताच तिव्र शब्दात स्मारक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, ऍड. संदीप फगरे, शिवाजीराव हिडदूगी, अशोक पांडव, विलास हल्याळी, विश्वनाथ रेळेकर यांनी जोरदार भाषण देत निषेध व्यक्त केला.
यावेळी भैयासाहेब कुपेकर, वसंत पाटील, मुन्नासो नाईकवाडी, अमर हिडदूगी, प्रकाश दळवी, प्रकाश देसाई, सरपंच आशिष साखरे, गावठाण सरपंच धोंडिबा नांदवडेकर, तळेवाडी सरपंच सागर देसाई, शिप्पूर सरपंच बाबुराव शिखरे, तारेवाडी उपसरपंच युवराज पाटील, सुरेश कुराडे, मजीद वाटगी, रामचंद्र परीट, कार्तिक कोलेकर, सुरेश बागी, प्रकाश मुरकुटे, पिराजी सासुलकर, प्रशांत नाईक, एस. एन. देसाई, भिकाजी दळवी, रविंद्र बोरगल्ली, अनिता मटकर यांच्यासह शिवप्रेमी, ग्रामस्थ, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सपोनि प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.