११ लाख सात हजार सातशे ऐशी रुपयांचा मुद्देमाल जप्त, राधानगरी पोलिसांची कारवाई; सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात असलेल्या दाजीपूर ओलवन येथील ऋषिकेश होम स्टेमध्ये सुरू असणाऱ्या जुगारअड्ड्यावर छापा टाकून राधानगरी पोलिसांनी सुमारे ११ लाख सात हजार सातशे ऐशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अठरा आरोपींवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
या संदर्भात राधानगरी पोलीसाकडून माहिती अशी की, दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात ओलवण गावच्या हद्दीत विलास तुकाराम पाटील यांच्या मालकीचे ऋषिकेश होमस्टे आहे. ओलवण दाजीपूर येथील ऋषिकेश विलास पाटील याने रिसॉर्टमध्ये रम्मी नावाचा जुगार अड्डा सुरू केला होता. याची कुणकुण राधानगरी पोलीसांना लागताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 1 लाख सदतीस हजार दोनशे ऐशी रुपयांची रोख रक्कम, 45 हजार 500 रुपयांचे सहा मोबाईल, अल्टो कार, तवेरा, वॅगनार, एस क्रॉस आशा चारचाकी 9 लाख पंचवीस हजार किमतीच्या चार गाड्या असा ११ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत महेश जोशी रा. मालवण, महेश गांधी रा. कणकवली, शरद गुरव रा. खारेपाटण, दत्ता वाघमारे रा. कणकवली, किशोर सावंत रा. फोंडा घाट, अनिल सिलकर रा. कणकवली, संदीप राणे, जयवंत बाईत, निलेश हेरेकर रा. सिंधुदुर्ग, रामचंद्र धुरसोळे, सुधीर गांधी रा. खारेपाटण, दिनेश जैतापकर राजापूर, अलपेश गांधी, प्रकाश साळवी रा.फोंडा, विशाल मोहिते रा. मालवण, विनायक शिर्के, मिलिंद कुबडे रा. फोंडा यांना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा- ढोलगरवाडी येथील नागपंचमी कार्यक्रम रद्द
ही कारवाई पोलीस निरीक्षक आपोसो कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ए एन खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग पाटील, बरगाले यांनी केली