खाण पीठातून पाणी सोडल्याचा संशय : शुद्धीकरण यंत्रणेवर येतोय ताण
प्रतिनिधी /फोंडा
खांडेपार नदीत खाण पीठातून चिखलगाळ मिश्रीत, गढूळ पाणी सोडण्यात आल्याने ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पावर ताण आला आहे. या प्रकारामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या काळात नळातून गढूळ पाणी सोडण्याशिवाय पाणी विभागापुढे अन्य पर्याय उरलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे पाणी अशाप्रकारे लाल होऊ शकत नाही. एखाद्या खाण पीठातून चिखलगाळ मिश्रित पाणी सोडल्याचा संशय ओपा पाणी प्रकल्पातील तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
धारबांदोडा व फोंडा तालुक्यातून वाहणाऱया दूधसागर व खांडेपार नदीचे पाणी ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून फोंडा व तिसवाडी तालुक्याला पुरविले जाते. शुक्रवारपासून खांडेपार नदीतून वाहणाऱया पाण्याचा रंग अचानकपणे बदलला आहे. नदीला पूर आल्यास किंवा खाण पीठातून पाणी सोडले गेल्यास असे घडू शकते.
पाणी तीनवेळा करावे लागते फिल्टर
अशा गढूळ पाण्यामुळे प्रकल्पातील शुद्धीकरण यंत्रणेवर ताण येतो व नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यापूर्वी ते दोन ते तीन वेळा फिल्टर करुन घ्यावे लागते. परिणामी नियमित पाणीपुरवठा मर्यादित स्वरुपात करावा लागतो. नदीचे पाणी स्वच्छ असल्यास एकदाच जलशुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर थेट नळांना पाणी सोडता येते, अशी माहिती पाणी विभागातील तज्ञांकडून मिळाली आहे.
गेल्या माहिन्याभरापूर्वी उसगाव भागातील नळांना गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावेळीही असा प्रकार घडला होता. गेल्या चार दिवसांपासून नदीच्या पाण्याचा रंग बदलला असून त्याचे शुद्धीकरण करताना ओपा प्रकल्पावर ताण वाढला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हे विघ्न उद्भवल्याने पाणीपुरवठा विभागावर नागरिकांमधून टीका होत आहे.