खानापूर तालुक्यातील फुलेवाडी येथे क्राफ्ट कौन्सिल ऑफ बेंगळूर यांच्यावतीने पंधरा दिवसांचे प्रशिक्षण उत्साहात
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुका हा मातीतल्या कलाकुसरतेचा तालुका समजला जातो. तालुक्मयात कुंभार समाजाचे लोक मातीच्या वस्तू व कुंभार कलांना प्रामुख्याने वाव देतात. येथील केंद्रीय ग्राम कुंभारी संस्थेच्या माध्यमातून अनेक होतकरूंना प्राधान्य दिले जाते. तालुक्मयातील फुलेवाडी गाव कुंभारी कलेचे माहेरघर समजले जाते. भविष्यात या ठिकाणी असलेल्या मातीतल्या कला अवगत करण्याचे काम येथील अनेक युवकांनी व महिलांनी हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात फुलेवाडी गाव हे टेराकोटा कलाकारांचे गाव म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन क्राफ्ट कौन्सिल ऑफ बेंगळूर या संस्थेच्या चेअरपर्सन श्रीमती मंगला नरसिंह यांनी व्यक्त केले.
सदर संस्थेच्यावतीने गेल्या पंधरा दिवसांपासून येथे टेराकोटा म्युरल आर्ट प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात तालुक्मयातील जवळपास पंधरा कलाकारांनी सहभाग घेतला होता. मातीतल्या विविध स्वरुपाच्या वस्तू बनविणे, टेराकोटा पद्धतीतून नवनवीन कलेला प्रोत्साहन देणे या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा बुधवारी सांगता कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला त्या प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी येथील कुंभारी कलेच्या कार्याबद्दल कौतुक करून क्राफ्ट कौन्सिलच्यावतीने मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव येथील जी. एस. एस. कॉलेजचे चेअरमन प्रा. शरद वालावलकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, खानापूर तालुक्मयात अनेक मातीतले कलाकार आहेत. या कलाकारांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे. पुंडलिक कुंभार यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत स्वतःच्या हाताने घडवणारी कुंभारी कला टेराकोटा कला या वाखाणण्यासारख्या आहेत. यासाठी कमीत कमी लाकडामध्ये मातीच्या वस्तू भाजण्यासाठी एक भट्टी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कुंभारी कलेला भविष्यात चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्यांचे गौरवोद्गार
खानापूर कुंभारी संस्थेचे प्राचार्य वीरेंद्र सिंग म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पण फुलेवाडी गावातील कलाकार त्याहूनही उत्तम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाला क्राफ्ट कौन्सिलचे फारुक शेख, श्रीमती रेवती व प्रशिक्षणार्थी मार्गदर्शक उल्हासकर आदी उपस्थित होते.