प्रतिनिधी /बेळगाव
जुना पी. बी. रोड, तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरातदेखील विशेष शक्ती असल्याचे मत सौंदत्ती श्री रेणुका देवी मंदिराचे पुजारी के. एस. यडोरय्या यांनी व्यक्त केले. गुरुवारी सकाळी त्यांनी तानाजी गल्लीतील श्री रेणुका देवी मंदिराला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
बेळगाव जिह्यासह कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिरात के. एस. यडोरय्या हे रोज नित्य पूजा पौराहित्य करत असतात. त्यांनी बेळगावातील रेणुका देवी मंदिरात विशेष पूजा केली. बेळगावच्या रेणुका देवी ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष राहुल मुचंडी यांनी सौंदत्ती मंदिराचे पुजारी यडोरय्या यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी यडोरय्या यांनी मंदिराच्या जिर्णोद्धार कामाची पाहणी केली. श्री रेणुका देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अनेक भाविकांकडून दिलेल्या मदतीतून सुरू आहे. यावेळी प्रकाश प्रभून्नावर, सुनील हलगेकर, रायनगडा पाटील आदी उपस्थित होते.