कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसीतील फौंड्री उद्योगातील सुयश कास्टींग प्रा.लि (प्लॉट नंबर- एच १५) या कारखान्यात कामगार काम करत असताना केमिकल लिक्वीडने भरलेल्या बॅरेलचा अचानक स्फोट झाला. याठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा ९० टक्के भाजल्याने त्याचा होरपळुन मृत्यू झाला. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
या दुर्दैवी घटनेत राहूल बाजीराव नंदीवाले (वय २५ रा. सुभाषनगर, मिरज) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. केमिकल लिक्वीडने भरलेल्या बॅरेलचा पत्रा कापत असताना अचानक बॅरेलचा स्फोट झाल्याने कामगार गंभीर भाजला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.