इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी नगरपरिषद आणि महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणत असल्याचे पाहून माजी नगरसेवक तथा दुहेरी मोका अंतर्गत कारवाई झालेल्या गुंड संजय तेलनाडे याने एका महिलेला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी 15 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा सनसनाटी आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
बुधवारी झालेल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विकासकामातील गैरव्यवहाराबाबत लक्षवेधी मांडली. या संपूर्ण प्रकरणात संजय तेलनाडे आणि सुनिल तेलनाडे यांचेच रॅकेट कार्यरत असल्याचे सांगत आमदार आवाडे यांनी, संजय तेलनाडे हा गुंड प्रवृत्तीचा असून कोणत्याही खात्यातील टेंडर कोणाला भरु देत नाही. सगळे मक्तेदार यांचे पगारी नोकर असून सर्व टेंडर दमदाटी करुन तेलनाडे स्वत:च घेतो. त्याच्यार दुहेरी मोकाचा अंतर्गत गुन्हे दाखल असून तो दोन वर्षे फरार होता. त्याला सोडविण्यासाठीच अटक करण्यात आली आणि कोणाच्या वशिल्याने त्याला सोडण्यात आले. महानगरपालिकेतील गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढून त्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवत असल्याचे पाहून संजय तेलनाडे याने काही महिलांना हाताशी धरुन माझ्यावर खोटे आरोप करत गुन्हे दाखल करण्यासाठी 15 कोटी रुपयांची सुपारी दिली. या संदर्भात संबंधित महिलेचे पत्र आणि त्यावर माझे कव्हरींग लेटर देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितावर कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.