उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील सिद्धार्थनगरमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठाच गदारोळ उठला असून उलटसुलट चर्चा सुरु आहे. अनुपकुमार नामक युवकाने आपल्या पत्नीला बाळंतपणासाठी एका खासगी रुग्णालयात पोहचविले होते. त्यापूर्वी या पत्नीची काही रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी करण्यात आली होती. या सर्व चाचण्यांमध्ये या पत्नीला जुळे होणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे तिच्या पतीसह सर्व कुटुंबियांनी ‘दोन अतिथीं’च्या आगमनाची यस्थास्थित सज्जता अतिशय आनंदाने करुन ठेवली होती.
यथावकाश ही पत्नी बाळंत झाली. तथापि, दोनऐवजी तिने एकाच अपत्याला जन्म दिला. शस्त्रक्रिया कक्षाच्या बाहेर तिचे सर्व कुटुंबिय दोन अपत्यांची प्रतीक्षा अतिशय उत्कंठेने करीत होते. पण प्रसूती झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी एकच बाळ कक्षाबाहेर आणून नातेवाईकांना दाखविले तेव्हा प्रचंड गोंधळ सुरु झाला. जुळे होणार हे निश्चित मानले जात होते. कारण सोनोग्राफीसह वैद्यकीय परिक्षणांचे सर्व अहवाल हा एकच निष्कर्ष नोंदवित होते. नातेवाईकांमध्ये चलबिचल सुरु झाली. दुसरे बाळ कसे झाले नाही ? त्याचे काही बरेवाईट तर नाही ना झाले ? की जन्मत:च त्याचे अपहरण करण्यात आले काय ? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात तरळू लागले. संतापाचा भडका उडायचा तेव्हढा उरला होता.
कुटुंबियांनी डॉक्टरला धारेवर धरले. तसेच शस्त्रक्रियागृहात जाऊन प्रसूत झालेल्या पत्नीची भेट घेण्याचा प्रयत्न पतीने केला. पण त्याला अडीच तासांनंतर भेटण्याची अनुमती मिळाली. अल्ट्रासाऊंड परिक्षणात दोन गर्भ स्पष्ट दिसत असताना जन्माला एकच कसा आला, असा प्रश्न विचारला असताना रुग्णालयाने कुटुंबियांना तेथून घालवून दिले. आता या प्रकरणी पोलिसात तक्रार सादर करण्यात आली असून उच्चस्तरीय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. वैद्यकीय शास्त्राला बुचकळ्यात टाकणारी ही घटना चर्चेचा विषय बनली असून अद्याप हे गूढ उकलेले नाही.