ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना भवनासह, पक्षाच्या सर्व शाखा आणि बँकांमधील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्या, अशी मागणी वकील आशिष गिरी यांनी केली आहे. गिरी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली असून, त्यावर 24 एप्रिलला सुनावणी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आशिष गिरी म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. आता दादरमधील शिवसेना भवन, मुंबईतील 227 प्रभागांमध्ये असणाऱ्या शाखा आणि बँकांमधील पक्षनिधीचे काय होणार असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, शिवसेना पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे तो पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा. तसेच या संदर्भात निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
मी वकील असण्यासोबत एक मतदार सुद्धा आहे. म्हणुन मी ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. ही याचिका मी माझ्या बाजूने दाखल केली आहे. मी कोणाच्याही बाजूने ही याचिका दाखल केलेली नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.