केक, पुष्पगुच्छ-लिंबू देऊन नववर्ष स्वागताची पोलीस दलात परंपरा
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनीही केक कापून, पुष्पगुच्छ आणि हातात लिंबू देऊन नववर्षाचे स्वागत केले आहे. रविवारी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयात केक कापला.
नववर्षाचे स्वागत असो किंवा इतर कोणताही सण असो, पोलीस नेहमी बंदोबस्तात असतात. आधी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडून नंतर त्यांना सण साजरा करावा लागतो. 31 डिसेंबर रोजी रात्री बेळगाव शहर व जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर होती.
बंदोबस्त यशस्वी झाल्यानंतर रविवारी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी केक कापून नव्या वर्षाचे स्वागत केले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार यांनी नागरिकांना केले.
यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, लोकायुक्त विभागाच्या पोलीसप्रमुख यशोदा वंटगोडी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, राज्य राखीव दलाचे पोलीसप्रमुख हामजा हुसेन आदींसह इतर अधिकारीही उपस्थित होते.
जिल्हा पोलिसांप्रमाणेच बेळगाव शहरातही पोलीस अधिकाऱ्यांनी नववर्षाचे स्वागत केले. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी शहरातील बहुतेक अधिकारी त्यांच्याकडे दाखल झाले होते. पोलीस दलात एकमेकांना लिंबू देऊन नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. सुरुवातीला पोलीस निरीक्षकाच्या घरी जातात. त्यानंतर निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांना घेऊन एसीपीच्या घरी पोहोचतो. एसीपी डीसीपी व आयुक्तांकडे जाऊन शुभेच्छा देण्याची परंपरा आहे.