कॅनडा म्युझियममध्ये धूमधडाक्यात साजरा झाला वाढदिवस
कुणाही विशेष व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणे नेहमीच आनंददायी असते, याची तयारी अनेक दिवसांपूर्वीच सुरू केली जाते. असेच काहीसे कॅनडात दिसून आले आहे. तेथे एका कासवाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हॅलिफॅक्स संग्रहालयात त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
1940 च्या दशकापासून हॅलिफॅक्सच्या एका संग्रहालयात हा कासव राहत आहे. चालू महिन्यात याला कासवाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच आनंदापोटी संग्रहालयाने विशेष आयोजन करत 12 ऑगस्टपासून सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एका फुटबॉल क्लबने ट्विटरवर 100 वर्षे वय असलेल्या कासवाची छायाचित्रे शेअर केली आहेत. सर्वात जुना वाँडरर्सचा चाहता असे या फुटबॉल क्लबने नमूद केले आहे. संग्रहालयाने गस या कासवाची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत. वयाची 100 वर्षे पूर्ण करणे गस या कासवासाठी मोठी कामगिरी आहे. गस याला ‘लेटय़ूस किंग’ या नावानेही ओळखले जाते. तो सर्वात जुना गोफर प्रजातीच कासव आहे.