वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
17 ते 22 जानेवारी दरम्यान येथे होणाऱया योनेक्स सनराईज इंडिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉ मध्ये पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, आणि एच. एस. प्रणॉय यांचा एकाच विभागात उपांत्यपूर्व फेरीसाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
या स्पर्धेत महिला एकेरीच्या विभागात भारताची माजी विश्वविजेती आणि ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती पी. व्ही. सिंधूला पहिल्या फेरीत सुपिंदा कॅथेलाँगशी लढत द्यावी लागणार आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरवरील ही सुपर 750 दर्जाची स्पर्धा आहे. विद्यमान विजेते सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना सलामीच्या सामन्यात डेन्मार्कच्या बे आणि मॉलहिडेशी मुकाबला करावा लागणार आहे. या स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांच्या कामगिरीवरच भारताचे यश अवलंबून राहील. या स्पर्धेत डेन्मार्कचा विश्व आणि ऑलिम्पिक विजेता व्हिक्टर ऍक्सेलसन, चीनची शी क्वी तसेच जपानचा मोमोटा सहभागी होत आहेत.
भारताचा लक्ष्य सेन हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता असून त्याचा सलामीचा सामना भारताच्या एच. एस. प्रणॉयशी होणार आहे. या सामन्यातील विजेत्याची पुढील फेरीत गाठ जपानच्या मोमोटोशी पडणार आहे. या स्पर्धेतील माजी विजेता किदाम्बी श्रीकांतला पहिल्याच फेरीमध्ये डेन्मार्कच्या टॉप सीडेड ऍक्सेलसनशी मुकाबला करावा लागेल. सायना नेहवालचा पहिल्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या मिया बिचफिल्डशी होणार आहे. भारताचे नवोदित बॅडमिंटनपटू मालविका बनसोड तसेच आकषी काश्यप हे पहिल्यांदाच सुपर 750 दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होत आहेत. बनसोडचा सलामीचा सामना थायलंडच्या 11 व्या मानांकित बुसानेनशी तर आकषी काश्यपचा पहिल्या फेरीतील सामना अमेरिकेच्या झेंगशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसी जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा पहिल्या फेरीतील सामना फ्रान्सच्या लॅम्बर्ट आणि टेन यांच्याशी होणार आहे.