तोतया पोलिसांना अंगावरील दागिने न देण्याचा पोलिसांचा सल्ला
प्रतिनिधी /म्हापसा
108 रुग्णवाहिकेच्या चालकास व महिला परिचारिकेस पर्रा येथे रात्रीच्यावेळी मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी मनप्रित सिंग (राहणारा मुंबई) या पर्यटकास अटक केली आहे. कळंगूट येथे झालेल्या अपघातातील जखमीला इस्पितळात नेत असताना दारूच्या नशेत हा मारहाणीचा प्रकार घडला असल्याची माहिती म्हापसा पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली. याप्रकरणी स्वप्नाली कुराणे यांनी म्हापसा पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली आहे. रुग्णवाहिका चालक दयेश परवार यालाही मारहाण केल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.
कळंगूट येथे दुचाकीचा अपघात झाल्यावर दुचाकीच्यामागे बसलेल्या मनप्रित सिंग याने 108 रुग्णवाहिकेला फोन केला असता रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी पोहोचली. दुचाकीचालक गंभीर अवस्थेत खाली पडला असता त्याला 108 मध्ये घालून म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात नेण्यात येत असताना मनप्रित सिंग दारूच्या नशेत होता. त्याने रुग्णवाहिकेतील परिचारिकेवर थप्पड मारली. त्याला अडविण्यासाठी चालक गाडी थांबवून बाहेर आला असता मनप्रितने चालकावरही हातातील कडा मारला असता तोही जखमी झाला. नंतर तेथे लोक जमल्यावर त्वरित पोलिसांना बोलावण्यात आले व पोलिसांनी मनप्रितला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
कुणालाही अंगावरील दागिने देऊ नका
राज्यात सध्या इराणी गँग सक्रिय झाले असून आपण पोलीस असल्याचे भासवून ते वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्याकडून दागिने काढून घेतात. अशा तोतया पोलिसांवर जनतेने विश्वास ठेवू नये. पोलीस कुणालाही अंगावरील दागिने काढून द्या, असे सांगत नाही. तसे काही आढळून आल्यास वा संशयित सापडल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्या असे आवाहन पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी केले आहे. म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत तीन व पर्वरी येथे एक मिळून एकूण चार घटना नोंद झाल्या आहेत. पोलिसांनी त्या संशयिताचे स्पॅचही जारी केले आहे. सर्व पोलीस स्थानकात त्यांचे फोटो पाठविण्यात आले आहे.
म्हापशात सर्व मसाज पार्लरची पडताळणी, संशयास्पद काही नाही
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावर म्हापशात पोलिसांनी सर्व मसाज पार्लरची तपासणी केली आहे. मात्र संशयास्पद असे काहीच आढळून आले नसल्याची माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली. काही मसाज पार्लर बंद आहेत. काही सलून सुरू आहेत मात्र तेथे काहीच संशयास्पद नसल्याचे ते म्हणाले. टाऊड दलाल यांच्याकडे पोलिसांचे लक्ष आहे. तसे आढळल्यास त्यांना अटक करू असे ते म्हणाले.